कोल्हापूरच्या कोमल कांबळे यांनी बिटाची ही पाककृती सांगितली आहे. खरंतर त्या एक गृहिणी आहेत. मात्र त्यांचे अर्धवट राहिलेले शिक्षण त्यांनी पूर्ण करायचे ठरवले होते. मग त्यासाठी त्यांनी कोल्हापूरच्या देशभक्त रत्नाप्पा कुंभार आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज या ठिकाणी आपले शिक्षण पूर्ण करायला सुरुवात केली. याच ठिकाणी त्यांना पाककलेची आवड लागली. महाविद्यालयातील पाककलेच्या स्पर्धेत त्यांनी हीच 'बिटाच्या पौष्टिक लाडूची' पाककृती सादर करत पारितोषिक मिळवले.
advertisement
डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली डिश कधी खाल्लीय का? पाहा कुठे मिळतीय
बिटाच्या लाडूसाठी साहित्य
बीटाचे लाडू बनवण्यासाठी अगदीच ठराविक साहित्य लागते. साधारण आकाराचे 6 ते 8 लाडू बनवण्यासाठी 1 वाटी बीट खिसून घ्यावे. तसेच एक नारळ खवून बारीक करुन घ्यावा. एक वाटी गूळ, थोडी दुधावरची साय, थोडे तूप, काजू, बदाम, पिस्ता भाजून बारीक केलेली पुड आणि थोडे काप घ्यावेत.
काय आहे पाककृती?
सर्वप्रथम पॅनमध्ये तूप टाकून बिटाचा किस भाजून घ्यावा. साधारण 2-3 मिनिट मध्यम आचेवर हा किस थोडा रंग बदलेपर्यंत भाजावा. त्याच पॅनमध्ये खोबरे तूप टाकून भाजावे. खोबरे देखील किमान 3 मिनिट मध्यम आचेवर भाजून घ्यावे. खोबरे एका बाजूला भाजून घेत असताना दुसऱ्या बाजूला गूळ वितळवून घ्यावा. त्यासाठी गूळ बारीक करुन त्यामध्ये फक्त 2 चमचे पाणी टाकावे. गुळाचा पूर्ण पाक होईपर्यंत तो वितळवून घ्यावा.
70 पेक्षा जास्त वर्षांपासून कोल्हापुरात प्रसिद्ध आहे खांडोळी; पाहा कशी झाली सुरुवात
भाजून झालेल्या खोबऱ्यामध्ये बिटाचा किस टाकावा. हे मिश्रण एकजीव करुन त्यात 2 चमचे साय टाकावी. यामध्ये वितळवून घेतलेल्या गुळाचा पाक टाकावा. हे सर्व मिश्रण साधारण 4-5 मिनिटे बारीक आचेवर हलवत रहावे. हळूहळू हे मिश्रण एकजीव व्हायला लागेल. या मिश्रणामध्ये घट्टपणा यायला लागल्यानंतर काजू, बदाम, पिस्ता भाजून त्याची केलेली पुड वरुन टाकावी आणि पुन्हा व्यवस्थित हलवत रहावे. आता हे मिश्रण लाडू बांधण्यासाठी तयार झाले आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊन हे मिश्रण थोडे गरम असतानाच मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावेत. लाडू वळताना वरुन बेदाणे, काजू, बदामचे काप आवडीनुसार लावू शकतो, असंही कोमल सांगतात.
बिटाच्या सेवनाचे हे आहेत फायदे
बीट हे खरंतर अनेक कारणांसाठी आरोग्यास उपयुक्त कंदमूळ आहे. बीटामधील घटकांमुळे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी बीट हे प्रभावी ठरते. बिटात भरपूर फायबर असते, त्यामुळे त्याच्या सेवनाने पचनक्रिया सुरळीत राहते आणि बद्धकोष्ठतासारख्या अनेक गंभीर समस्या कमी होतात. तर तज्ज्ञांच्या मते, बिटाचे नियमत सेवन हे स्टॅमिना वाढवण्यासही मदत करते.