सांगली: हिवाळ्यात उत्तम आरोग्यासाठी आहाराकडे सर्वांचं लक्ष असतं. अनेकजण आपल्या घरात विविध प्रकारचे पौष्टिक लाडू बनवत असतात. रवा, बुंदी सोबतच मेथीचे, डिंकाचे लाडू तुम्ही खाल्ले असतील. परंतु, शरीरात उष्णता निर्माण करणारे आणि रक्त वाढीसाठी मदत करणारे 'इम्युनिटी बूस्टर' असे मनुक्याचे लाडू तुम्ही कधी खाल्ले आहेत का? अगदी पौष्टिक अशा मनुक्यांच्या लाडूची रेसिपी सांगलीतील गृहिणी सारिका होनमाने यांनी सांगितली आहे.
advertisement
मनुक्याचे लाडू बनविण्यासाठी साहित्य
मनुक्याचे लाडू बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. पिवळे मनुके 250 ग्रॅम, तूप - दोन चमचे, दूध पावडर 100 ग्रॅम, गुळ किंवा साखर 100 ग्रॅम, काजू किंवा बदाम- चवीप्रमाणे घ्यावेत.
Coriander Soup: किडनी आणि कॅल्शियमसाठी वरदान कोथिंबीर सूप, घरच्या घरी झटपट कसं करायचं?
मनुक्याचे लाडू बनविण्याची कृती
250 ग्रॅम मनुके साध्या पाण्याने दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. मनुके पाच ते सहा तास पाण्यात भिजत ठेवावेत. भिजलेल्या मनुक्यातील उरलेले पाणी काढून टाकावे आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्यावी. मंद आचेवर कढई ठेवावी. गरम कढईमध्ये दोन चमचे तूप घालावे. कडलेल्या तुपामध्ये मनुक्याची पेस्ट घालावी. पेस्ट सतत परतत राहावी. थोडासा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये दूध पावडर घाला.
पुढे बारीक चिरलेला गुळ किंवा साखर त्यात घाला. 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर सर्व मिश्रण एकसारखे परतत राहावे. 15 ते 20 मिनिटात मिश्रण घट्ट येताच त्यामध्ये बारीक चिरलेले काजू किंवा बदामाचे काप टाकावेत आणि वेलची पावडर टाकावी. गॅस बंद करून थंड होईपर्यंत मिश्रण तसेच ठेवावे. मिश्रण थंड होताच तुपाचा हात घेऊन लहान-लहान लाडू वळावेत. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं ही रेसिपी तयार होते.
दरम्यान, चवीला अगदी अप्रतिम असणारे हे मनुक्याचे लाडू महिनाभर टिकतात. साखरेपेक्षा गुळाचा वापर केल्यास लाडूंना उत्तम चव येते. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणारे हे पौष्टिक लाडू नक्की बनवून पाहा.