अमरावती: हिवाळ्यामध्ये विदर्भात ओल्या तुरीच्या दाण्यापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका. विदर्भातील सर्वजण हा पदार्थ अगदी आवडीने बनवतात. हिरवी मिरची वापरून बनवलेला झणझणीत झुणका भाकरी सोबत अतिशय टेस्टी लागतो. काही वेळा हाच झुणका चटणी म्हणून सुद्धा वापरला जातो. हिवाळा सुरू झाला की, विदर्भात नवनवीन पदार्थाची मेजवानी सुरू होते. त्यापैकी एक असलेला आणि कमीतकमी वेळात तयार होणारा विदर्भ स्टाईल ओल्या तुरीच्या दाण्याचा झुणका कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीतील गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
झुणका बनवण्यासाठी साहित्य
ओल्या तुरीचा कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल तिखट, हळद, धनी पावडर, जिरे, मोहरी, तेल, मीठ, ओले तुरीचे दाणे.
विदर्भ स्पेशल, हिवाळ्यात बनवा पाण्यातील गोळे, एकदा खाल तर पुन्हा कराल
झुणका बनवण्याची कृती
सर्वात आधी तुरीचे दाणे थोडे तेल घालून हलके भाजून घ्यायचे. त्यानंतर ते मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे. एकदम बारीक करायचे नाहीत. दाणे जास्त बारीक केल्यास झुणका मोकळा होणार नाही. दाणे बारीक करून घेतल्यानंतर कढईत तेल घालून फोडणी तयार करून घ्यायची. जिरे, मोहरी, कांदा, हिरवी मिरची घालायची. ते थोडी लाल होऊ द्यायची. त्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, धने पावडर घालायचे. तिखट थोडं शिजवून घ्यायचं. त्यानंतर त्यात टोमॅटो घालून फोडणी पुर्णतः कसून घ्यायची. त्यानंतर त्यात बारीक केलेले दाणे घालून ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं.
सारण खूप मोकळं वाटत असेल तर तुम्ही त्यात पाण्याचा फुलवा देऊ शकता. त्यानंतर ते थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घ्यायचं. त्यांनतर त्यात कोथिंबीर घालायची. झुणका खाण्यासाठी तयार होतो. हा झुणका ठेचा,भाकरी आणि कांद्यासोबत अतिशय टेस्टी लागते. हाच झुणका तुम्ही कच्चे दाणे वापरून सुद्धा करू शकता. त्याची टेस्ट यापेक्षा खूप वेगळी लागेल.
दरम्यान, हिवाळ्यात येणारे तुरीचे दाणे आरोग्यदायी मानले जातात. विदर्भात ओल्या तुरीच्या दाण्यांच्या विविध रेसिपी बनवल्या जातात.