ज्या नद्या, तलाव किंवा समुद्रातून हे मासे आपल्यापर्यंत येतात, तिथल्या वाढत्या प्रदूषण खूपच वाढत चाललं आहे. कधीकधी विषारी गॅस सोडल्यामुळे किंवा केमिकल पाण्यात सोडल्यामुळे केमीकलचं 'विष' माशांना मारतं आणि ते आपल्या शरीरात जात नाहीये ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थीत झाला आहे.
नदी-समुद्रातील वाढते प्रदूषण आणि त्याचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम यावर अलीगड मुस्लिम विद्यापीठातील (AMU) कृषी सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील संशोधक शिरजील अहमद सिद्दीकी यांनी नुकताच एक धोक्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, आपण जे मासे खातोय, ते आपल्याला ताकद देत आहेत की हळूहळू आजारी पाडत आहेत, हे ते मासे कुठून आले आहेत यावर अवलंबून आहे.
advertisement
सुरक्षित मासे खाण्याचा मार्ग?
सिद्दीकी यांच्या संशोधनानुसार, सर्वच मासे आरोग्यासाठी घातक नसतात. त्यांनी 'एक्वाकल्चर' (Aquaculture) म्हणजेच नियंत्रित वातावरणात केलेल्या मासेमारीला अधिक सुरक्षित मानले आहे. एक्वाकल्चरमध्ये माशांना स्वच्छ पाण्यात पाळले जाते आणि त्यांना दिला जाणारा आहारही नियंत्रित असतो. यामुळे प्रदूषित घटकांचा माशांच्या शरीरात प्रवेश करण्याचा धोका खूपच कमी होतो.
याउलट, नद्या, नाले किंवा औद्योगिक पट्ट्यांजवळील समुद्रातून पकडलेले मासे थेट प्रदूषणाच्या संपर्कात असतात. कारखान्यांचे सांडपाणी आणि रासायनिक कचरा पाण्यात मिसळल्यामुळे तिथले मासे कळत-नकळत ते घातक घटक शोषून घेतात.
प्रदूषित पाण्यातील रसायने माशांच्या शरीरात कशी शिरतात, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. मासे त्यांच्या त्वचा, कल्ले (Gills) आणि शरीरातील चरबीच्या माध्यमातून हानिकारक तत्वे शोषून घेतात. सिद्दीकी सांगतात की, काही हलकी रसायने काळानुसार नष्ट होतात, पण मरकरी (पारा), कॅडमियम आणि निकेल सारखे जड धातू (Heavy Metals) माशांच्या शरीरातील टिश्यूजमध्ये कायमचे जमा होतात.
जेव्हा हे मासे मानवी साखळीचा भाग बनतात, तेव्हा एक वैज्ञानिक प्रक्रिया घडते, जिला 'बायोमॅग्निफिकेशन' (Biomagnification) म्हणतात. याचा अर्थ असा की, पाणी आणि छोट्या माशांमध्ये असलेल्या विषाची मात्रा, मोठ्या माशांमार्फत माणसापर्यंत पोहोचेपर्यंत कित्येक पटीने वाढलेली असते. हे वाढलेले विष मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते.
तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतो?
प्रदूषित माशांचे सेवन केल्याने त्याचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत, पण दीर्घकाळात ते गंभीर रूप धारण करू शकतात.
1. रोगप्रतिकारशक्ती: शरीराची नैसर्गिक लढण्याची क्षमता कमी होते.
2. महत्त्वाचे अवयव: याचा थेट परिणाम किडनी आणि लिव्हरवर होतो.
3. गंभीर आजार: सतत अशा माशांचे सेवन केल्यास कर्करोगासारख्या (Cancer) जीवघेण्या आजारांचा धोका संभवतो.
मग बचाव कसा करायचा?
हे वाचून मासे खाणे सोडून देण्याची गरज नाही, पण थोडी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. संशोधक सिद्दीकी यांनी काही उपाय सुचवले आहेत. शक्य असल्यास मासे कुठून आले आहेत याची खात्री करा. नियंत्रित फार्ममधील (Aquaculture) माशांना प्राधान्य द्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. प्रदूषित भागातील माशांचे सतत सेवन टाळा.
सर्वात मोठा बदल हा सरकारी स्तरावर होणे गरजेचे आहे. नद्या आणि समुद्रात रासायनिक कचरा सोडू नये, यासाठी कडक नियम असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर, थंडीत माशांचा आनंद जरूर घ्या, पण आपला 'सी-फूड' (Sea Food) हा आरोग्याचा खजिना ठरावा, प्रदूषणाचे घर नाही, याची काळजी आपण आणि प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.
