नवी दिल्ली : उन्हाळा येताच त्वचा काळवंडायला अर्थात स्किन टॅन व्हायला सुरुवात होते. अशावेळी त्वचेची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं. महत्त्वाचं म्हणजे केवळ उन्हापासून नाही, तर प्रदूषणापासूनही त्वचेचं रक्षण करावं लागतं. यासाठी आपण फार महागडेच प्रॉडक्ट वापरायला हवे, पार्लरमध्येच जायला हवं असं काही नाही. आपण घरच्या घरी काही सोप्या उपायांनीही त्वचा छान मऊ, तजेलदार आणि उजळ ठेवू शकता. कशी? जाणून घेऊया.
advertisement
लिंबू आणि मधाचं मिश्रण :
लिंबात नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेला आराम मिळतो. तर, मध त्वचेला मॉइश्चराइज करतं. मधात लिंबाचा रस मिसळून ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी. मग 15-20 मिनिटांनी चेहरा धुवून घ्यावा. या उपायामुळे टॅनिंग हळूहळू कमी होऊ शकतं.
दही आणि हळदीचा पॅक :
दह्यात लॅक्टिक अॅसिड असतं, ज्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. तसंच हळदीत अँटिऑक्सिडंट असतं, ज्यामुळे त्वचा उजळते. दही आणि हळदीची पेस्ट चेहऱ्यावर लावून 20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. नियमितपणे हा उपाय केल्यास टॅनिंग निघण्यास मदत मिळते.
बटाट्याचा रस :
बटाट्याच्या रसामुळे त्वचेला आराम मिळतो, तसंच टॅनिंग कमी होतं. सुरुवातीला बटाट्याचे बारीक काप करून घ्यावे, त्यातून रस काढावा आणि तो उन्हाने काळसर पडलेल्या भागावर लावावा. 15-20 मिनिटांनी तो भाग स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे त्वचा छान मऊ होऊ शकते आणि टॅनिंगही निघू शकतं.
मुलतानी माती आणि गुलाबपाण्याच्या पॅक :
मुलतानी मातीमुळे त्वचा आतून स्वच्छ होते, तसंच गुलाबपाण्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो. मुलतानी माती आणि गुलाबपाण्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावावी. मग 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅनिंग कमी होण्यास मदत मिळू शकते.
काकडी आणि टोमॅटोचं मिश्रण :
काकडी आणि टोमॅटो दोन्हीमुळे त्वचेला गारवा मिळतो. शिवाय टॅनिंगही सहजपणे निघतं. त्यासाठी काकडी आणि टोमॅटोचा रस काढून त्वचेवर लावावा. काही मिनिटांनी त्वचा स्वच्छ धुवून घ्यावी. यामुळे टॅनिंग जरा कमी झालेलं दिसेलच शिवाय त्वचा मऊदेखील होईल.