कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture Success: सध्या कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने दत्तात्रय डोंगरे यांनी पर्यायी उत्पन्नासाठी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला.
सोलापूर – बदलत्या काळानुसार बळीराजा अधिक प्रयोगशील होत असून शेतीमध्ये विविध पिके व आंतरपीक घेण्याकडे कल वाढताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरीचे शेतकरी दत्तात्रय डोंगरे यांनीही शेतीत असा वेगळा प्रयोग करून चांगले उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक कांदा पिकासोबत त्यांनी पहिल्यांदाच दहा गुंठ्यांमध्ये गुलछडीची लागवड केली आणि अवघ्या चार महिन्यांत लाखाचा नफा मिळवला आहे.
सध्या कांद्याला बाजारात अपेक्षित भाव मिळत नसल्याने दत्तात्रय डोंगरे यांनी पर्यायी उत्पन्नासाठी प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शेताची मशागत करून त्यामध्ये भरपूर शेणखत टाकत गुलछडीची लागवड केली. दहा गुंठ्यांमध्ये गुलछडीची लागवड करण्यासाठी त्यांना सुमारे 28 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. लागवडीनंतर सुमारे चार महिन्यांनी फुलांची तोडणी सुरू झाली. या कालावधीतच लागवडीचा खर्च निघून गेला आणि आतापर्यंत त्यांना सुमारे एक लाख रुपयांचा नफा मिळाला आहे.
advertisement
विशेष म्हणजे, एकदा लागवड केलेली गुलछडीची झाडे तीन वर्षांपर्यंत उत्पन्न देतात. त्यामुळे पुढील काळातही कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळणार आहे. या गुलछडीची विक्री सोलापूर जिल्ह्यातून थेट मुंबई येथील दादर फुलबाजारात केली जाते. सणासुदीच्या काळात गुलछडीला मोठी मागणी असते. गेल्यावर्षी या फुलाला प्रति किलो 1600 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. आता 40 रुपये ते 150 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. सरासरी 60-70 रुपयांपर्यंत भाव मिळाला तरीही चांगलं उत्पन्न होतं, असं डोंगरे सांगतात.
advertisement
कांद्यासारख्या पिकासोबत आंतरपीक म्हणून गुलछडीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा चांगला स्रोत मिळू शकतो, असा सल्लाही प्रयोगशील शेतकरी दत्तात्रय डोंगरे यांनी इतर शेतकऱ्यांना दिला आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे परिसरातील अनेक शेतकरी गुलछडी लागवडीकडे वळण्याचा विचार करत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 2:05 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
कांद्याच्या शेतात लावलं 'पैशाचं पीक', 3 वर्षे नो टेन्शन, फक्त तोडायचं अन् विकायचं, कमाई किती? Video






