1. श्री संत गजानन महाराजांचे मंदिर
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे भव्य असे मंदिर आहे. विदर्भातील सर्वात भव्य आणि आकर्षक मंदिर म्हणून या मंदिराची ओळख आहे. या मंदिरातील स्वच्छता आणि नियोजन याला कुठेही जोड नाही. अगदी राहण्याची व्यवस्था, जेवण सर्व काही येथे तुमच्या मनासारखं तुम्हाला मिळतं. राहण्यासाठी भक्त निवास असल्याने कमीत कमी खर्चात तुमची राहण्याची व्यवस्था होते. भक्तनिवासामध्ये मुक्काम करून तुम्ही तेथील इतर ठिकाणी फिरून येऊ शकता.
advertisement
एक सायकल, एक स्वप्न आणि 15000Km चा दृढनिश्चय; महेश निघाला जग जोडायला, पण का?
2. कृष्णाजीचा मळा
मंदिराच्या मागच्या बाजूला काही अंतरावर कृष्णाजीचा मळा हे ठिकाण आहे. अतिशय शांत वातावरण येथे असतं. या ठिकाणी महाराजांनी जळत्या पलंगावर बसून चमत्कार दाखविला. तसेच ब्रम्हगिरीचे गर्व हरण करून त्याला प्रचिती दिली असल्याची आख्यायिका आहे. त्याच परिसरात शिव मंदिर सुद्धा आहे. मोठे वटवृक्ष आहे, तिथे महाराज नेहमी बसत होते.
3. महालक्ष्मी मंदिर
त्यानंतर बाळापूर रोडवर महालक्ष्मी मंदिर आहे. हे मंदिर अतिशय आकर्षक आहे. मंदिरातील देवीची मूर्ती ही मनाला आनंद देऊन जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वातावरण याठिकाणी बघायला मिळते. नवनवीन दुकानं सुद्धा त्या मंदिराच्या परिसरात आहेत. त्याचबरोबर विदर्भातील फेमस गांधी ग्रामची गुळपट्टी सुद्धा मिळते.
4. आर्ट गॅलरी
त्यानंतर श्री संत गजानन महाराज मतिमंद विद्यालय देखील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात आहे. तेथील बौद्धिक दिव्यांग असलेल्या मुलांनी स्वतःच्या हाताने नवनवीन वस्तू बनवलेल्या आहेत. त्या वस्तूंची आर्ट गॅलरी या ठिकाणी तयार केलेली आहे. त्यामध्ये टेराकोटा मातीपासून बनवलेल्या वस्तू, नवनवीन फ्रेम आपल्याला तिथे बघायला मिळतात.
5. माऊली वॉटर पार्क
देवदर्शन झाल्यानंतर तुम्ही माऊली वॉटरपार्क येथे जाऊ शकता. हे वॉटर पार्क खामगाव रोडवर आहे. येथील तिकीट ही 700 ते 800 रुपये प्रति व्यक्ती अशी असल्याची माहिती मिळते. याठिकाणी तुम्हाला 6 प्रकारच्या ॲक्टिव्हिटी, कॅफेटेरिया, चेंजिंग रूम, ब्लॉकर्स या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतं.
शेगावला गेल्यानंतर देवदर्शन आणि मजा मस्ती तुम्ही सोबत आणि कमीत कमी खर्चात करू शकता. तर या उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासह भेट देऊ शकता.