जालना: छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अनेकदा महापुरुषांच्या जयंती नाचून नव्हे तर वाचून साजऱ्या करा, त्यांचे विचार आत्मसात करा, असे सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात. मात्र याचा प्रत्यक्षात अवलंब फार कमी लोक करतात. त्यापैकीच एक जालना जिल्ह्यातील मांडवा येथील केवळ नऊ वर्षांचा शौर्य चंद हा लहानगा आहे. केवळ दोन वर्षांचा असताना त्याने पहिल्यांदा शिवनेरी किल्ला चढला. त्यानंतर एक एक करत आतापर्यंत त्याने तब्बल 43 गड आणि किल्ले सर केले. शिवजयंतीनिमित्त लोकल18 च्या माध्यमातून शौर्य चंद आणि त्याच्या कामगिरीबाबत याच्याबद्दलच जाणून घेऊ.
advertisement
शौर्य रामेश्वर चंद हा जालना जिल्ह्यातील मांडवा या छोट्याशा गावातील रहिवासी आहे. त्याचे वडील रामेश्वर चंद हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुरक्षारक्षक आहेत. सध्या रामेश्वर चंद हे मुलासह ठाणे या शहरामध्ये वास्तव्यास आहेत. शौर्य हा त्यांचा दोन वर्षांचा मुलगा ठाणे येथीलच एका हायस्कूलमध्ये शाळेत जातो. त्याचे वडील रामेश्वर चंद यांना गड किल्ले सफारीची आवड आहे. मुलगा दोन वर्षांचा झाल्यानंतरच त्यांनी पहिल्यांदा शौर्याला शिवनेरी या किल्ल्याची सफर घडवली. एक एक करत वडिलांसोबत शौर्याने आतापर्यंत 43 गडकिल्ल्यांची यशस्वी चढण केली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असलेले कळसूबाई शिखर देखील शौर्याने यशस्वीरित्या सर केले आहे.
किल्ल्यावरील मातीचा संग्रह
शौर्य चंद हा हा मूर्ती लहान पण कीर्ती महान याचीच प्रचिती देणारा हा केवळ नऊ वर्षांचा अवलिया आहे. तो ज्या किल्ल्यावर जातो, तेथील माती घेऊन येतो. आतापर्यंत त्याने 40 हून अधिक गड किल्ल्यांवरील माती देखील आपल्या घरी संग्रही ठेवली आहे. “गड किल्ल्यावर गेल्यानंतर मी प्राचीन शिव मंदिरे, वाडे, तोफ आणि तोफ गोळे, विरगळ आदी आवर्जून पाहतो. गड किल्ल्यावर गेल्यानंतर मला तिथे शिवाजी महाराज आणि मावळे असल्याचा भास होतो. मला गड किल्ले सर करण्याची आवड माझ्या आई-वडिलांमुळे लागली. या सर्व गडकिल्ल्यावरील माती मी जमा केली असून दररोज या मातीचे पूजन करतो,” असं शौर्य चंद याने सांगितलं.