भीमकुंडाची आख्यायिका काय?
चिखलदरा परिसरात पवित्र आणि आकर्षक असे स्थळ आहे, ज्याला भीमकुंड असे म्हणतात. चिखलदऱ्यापासून हे ठिकाण फक्त 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. भीमकुंडचा उल्लेख महाभारतातील कथांमध्ये देखील झालेला दिसून येतो. या भीमकुंडाबाबत अशी आख्यायिका आहे की, पांडव अज्ञातवासात असताना भीमाने किचक नावाच्या बलाढ्य राक्षसाचा वध केला होता. किचक द्रौपदीचा छळ करीत असल्याने भीमाने त्याला ठार मारले. या घटनेनंतर भीमाने आपले हात ज्या कुंडात धुतले त्याला भीमकुंड असे नाव देण्यात आले, अशी तेथील आख्यायिका आहे. या घटनेमुळे या ठिकाणाला किचकदरा असेही म्हटले जाते, कारण जिथे किचकाचा वध झाला होता, अशी माहिती तेथील नागरिक देतात. हे सर्व पावित्र्य तर या ठिकाणचे आहेच, पण पावसाळ्यात निसर्ग सौंदर्यासाठी देखील हे स्थळ अतिशय प्रसिद्ध आहे.
advertisement
स्काय सायकलिंगसाठी प्रसिद्ध
चिखलदऱ्याला फिरायला गेल्यानंतर भीमकुंड या परिसरात तुम्ही गेले असता, त्याठिकाणी तुम्हाला स्काय सायकलिंगचा आनंद सुद्धा घेता येऊ शकतो. ॲडव्हेंचर पार्क म्हणून एक पॉइंट भीमकुंड येथे आहे. दरीच्या या काठावरून त्या काठावर स्काय सायकलिंगच्या माध्यमातून तुम्ही जाऊ शकता. ही सायकल एका जाडसर तारेवरून चालवावी लागते. वरून सुद्धा ती सायकल तारेला बांधलेली असते. ते अंतर जवळपास जाऊन येऊन 500 मीटर इतके आहे. दरीच्या या काठावरून त्या काठावर जाताना दिसणारा तो हिरवागार परिसर अतिशय आकर्षक दिसतो. अशाच अनेक बाबींचा आनंद घेण्यासाठी पर्यटक पावसाळ्यामध्ये चिखलदरा याठिकाणी जातात.
त्याठिकाणी सायकलिंग करणाऱ्याला स्वर्गाचा आनंद मिळतो. सायकलिंगबरोबरच याठिकाणी आणखी काही नवनवीन बाबी तुम्हाला बघायला मिळतील. याठिकाणी सायकलिंगसाठी 472 रुपये प्रति व्यक्ती असे शुल्क लागते. ते शुल्क देऊन तुम्ही सायकलिंगचा आनंद घेऊ शकता. चिखलदऱ्याला गेले असता, भीमकुंड या परिसरात भेट देऊ शकता.