मुंबई : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वसई शहरात गेल्या अनेक वर्षांमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने वाढ झाली आहे. वेगवेगळे थीम पार्क, रिसॉर्ट आपल्याला वसई-विरार मध्ये पाहायला मिळतात. अशातच नुकतच वसईमध्ये सुरू झालेल्या मिराज म्युझियम हे वसईकरांसाठी एक आगळावेगळा अनुभव ठरत आहे. वसई रेल्वे स्थानकापासून 10 मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मिराज म्युझियममध्ये डोळ्यांना भावणाऱ्या वेगवेगळ्या कलाकृती पाहायला मिळतील.
advertisement
मिराज म्युझियमच्या सुरुवातीलाच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे चित्र पाहायला मिळतील. या चित्रांमध्ये तुम्हाला पाहिल्यावर वेगळाच चक्र आणि गोल दिसून येईल. काळ्या-पांढऱ्या रंगाची वेगवेगळी चित्रे इथे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी नेमुन दिलेल्या जागा आहेत. या जागी उभे राहून पाहिल्यावर चित्रे वेगळी दिसतात.
मिराज म्युझियममधील सर्वात भारी जागा म्हणजे मिरर इन्फिनिटी रूम. या रूममध्ये गेल्यावर तुम्हाला चारही बाजूला आरसे आणि वेगवेगळे लॅम्प्स पाहायला मिळतील. हे लॅम्प्स आणि आरसे पाहिल्यावर असं वाटतं तुम्ही एका वेगळ्याच जगात प्रवेश केला आहे. त्यानंतर एक विहीर ज्याच्या आतमध्ये आरसा आहे पण तुम्हाला असं वाटतं की विहीर फार खोल आहे आणि तुम्ही विहिरीच्या दुसऱ्या बाजूने आतमध्ये बघत आहात.
तीन महिन्यापूर्वी सुरू झालेल्या वसईमधील मिराज म्युझियमचे दर पुढील प्रमाणे आहेत. 15 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तीसाठी 400 रुपये, 4 ते 14 वर्षापर्यंत 300 रुपये आणि 4 वर्षांखालील लहान मुलांसाठी येथे प्रवेश मोफत आहे.
वसईमध्ये सुरू झालेल्या या मिराज म्युझियमला विरार-वसईकरांचा आणि एकंदरीतच मुंबईकरांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. वसई रेल्वे स्थानकापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर मधुबन सिटी जवळ मिराज म्युझियम ही जागा आहे. वसई रेल्वे स्थानकापासून एका व्यक्तीसाठी इथे येण्यासाठी शेअर ऑटोने 20 रुपये घेतात. मिराज म्युझियमची वेळ सकाळी 11 ते संध्याकाळी रात्री 9:00 वाजेपर्यंत अशी आहे.