मूत्रपिंडांचे आजार पूर्वी केवळ वाढत्या वयाशी संबंधित समस्या मानले जात होते. पण, आता तरुणांमधे, अगदी मुलांमधेही मूत्रपिंडांच्या आजारांची प्रकरणं वाढतायत. मूत्रपिंडातील खडे हा एक गंभीर आजार म्हणून समोर आला आहे.
अयोग्य आहार आणि किडनी स्टोनचा धोका - एखाद्या आजारामुळे किडनीचं कार्य बिघडलं, तर शरीरात विषारी द्रव्यं जमा होऊ शकतात. ज्यांच्या खाण्याच्या सवयी अयोग्य असतात, त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका जास्त असतो.
advertisement
किडनीच्या समस्यांमुळे कॅल्शियम ऑक्झॅलेट आणि युरिक ॲसिडसारखे पदार्थ शरीरातून योग्यरित्या गाळले जाऊन बाहेर टाकले जात नाहीत, तेव्हा त्यांचे लहान स्फटिक एकत्र येऊन खडे तयार होतात. या खड्यांमुळे तीव्र वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते.
कमी पाणी प्यायल्यानं लघवी घट्ट होते, ज्यामुळे मुतखडा होण्याचा धोका वाढतो. लठ्ठपणा आणि जंक फूड खाणं, अतिरिक्त मीठ आणि साखर खाण, फायबरची कमतरता यांसारख्या आहारातील अनियमिततांमुळेही मुतखडा होण्याचा धोका वाढतो.
भारतीयांमधे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेचा धोका वाढतोय असा इशारा अनेक अहवालांमधून दिला जातोय. याचा थेट परिणाम हाडांवर होतो. या पोषक घटकांची कमतरता भरून काढण्यासाठी, लोक दीर्घकाळासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्याशिवाय सप्लिमेंट्स घेत राहतात. कधीकधी ही चूक तुमच्यासाठी खूप महाग ठरू शकते यामुळे किडन्यांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं.
अतिरिक्त कॅल्शियम आणि 'व्हिटॅमिन डी'चे धोके - आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात आणि दीर्घ कालावधीसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी खाल्ल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढू शकतो. व्हिटॅमिन डी ची वाढलेली पातळी शरीराद्वारे कॅल्शियमचं शोषण वाढवतं, ज्यामुळे लघवीतील कॅल्शियमचं प्रमाण वाढतं असं त्यामागचं कारण आहे. याला हायपरकॅल्सीयुरिया म्हणतात आणि यामुळे अशा व्यक्तींमधे किडनी स्टोनचा धोका वाढतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि माफक प्रमाणात सप्लिमेंट्स घेणं सुरक्षित असलं तरी, जास्त प्रमाणात किंवा दीर्घकाळ घेतल्यानं धोका वाढू शकतो. त्यामुळे कुठलंही औषध घेताना आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पाठीत किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना - व्हिटॅमिन डीच्या अतिसेवनामुळे आतड्यांमधे कॅल्शियमचं शोषण वाढतं, ज्यामुळे लघवीवाटे कॅल्शियमचे उत्सर्जन वाढतं.
कॅल्शियम सप्लिमेंट्स जेवणासोबत घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. केवळ कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्यानं मुतखडा होण्याचा धोका वाढतो असं दिसून आलं आहे. किडनी स्टोनमुळे अनेकदा सुरुवातीला पाठीत किंवा पोटाच्या खालच्या भागात तीव्र वेदना होतात. यासोबतच लघवी करताना जळजळ होणं, लघवीतून रक्त येणं आणि वारंवार लघवी होणं अशी लक्षणं दिसू शकतात. यामुळे ताप आणि उलट्या देखील होऊ शकतात.
किडनी स्टोन आहे की नाही याचं निदान अल्ट्रासाऊंड, रक्त तपासणी आणि मूत्र तपासणीद्वारे केली जाते.
उपचारांसाठी वेदनाशामक आणि खडे विरघळवून बाहेर काढण्यासाठीचीही औषधं असतात. गरज भासली तर शस्त्रक्रिया केली जाते. आधुनिक लेझर शस्त्रक्रियेमुळे त्वरित आराम मिळू शकतो.
