येथे आपण ज्या पेयाविषयी जाणून घेणार आहोत, त्याचे नाव कषाय आहे. हे कशाय अगदी चहासारखंच दिसतं आणि ते बनवण्याची पद्धत देखील चहाप्रमाणेच आहे. कषाय हे त्यातील घटकांमुळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. चहासारखेच दिसत अल्याने आणि ते प्यायल्यानंतर चहाप्रमाणेच तरतरी येत असल्याने ते तुम्हाला चहा सोडण्यास मदत करू शकते.
कषाय बनवण्यासाठी लागणारे साहित्य
advertisement
- धणे
- जिरे
- दालचिनी
- बडिशेब
- वेलची
- लवंग
- हळद
- सुंठ पावडर
- काळीमिरी
- पाणी
- गूळ
- दूध
कषाय पूड तयार करण्याची पद्धत
सर्वप्रथम धणे, जिरे, दालचिनी, बडिशेब, वेलची, लवंग आणि काळीमिरी समप्रमाणात घ्या आणि ते तव्यावर किंवा कढईत हलके भाजून घ्या. यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून थोडं थंड होऊ द्या. यानंतर हळद आणि सुंठ पावडर घालून ते मिक्सरमधून बारिक करून घ्या. अगदी पावडर होईल अशा पद्धतीने ते बारिक करून घ्या. तुमची कषाय पूड तयार आहे.
कषाय बनवण्याची पद्धत
कषाय बनवण्याची पद्धत अगदी सोपी आहे. तुम्ही चहा बनवता त्याप्रमाणे एक कप पाणी घ्या. त्यात एक चमचा कषाय पूड घाला आणि तुमच्या आवडीनुसार त्यात गूळ घाला. हे सर्व व्यवस्थित उकळून घ्या. त्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यात एक कप गरम दूध घाला. आता पुन्हा एक उकळी येऊ द्या. यानंतर ते कपात घ्या आणि त्याचा मस्त स्वाद एन्जॉय करा.
कषाय पिण्याचे फायदे
कषायमध्ये टाकलेले सर्व मसाल्याचे पदार्थ हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यामुळे तुमच्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास आणि हंगामी आजार दूर ठेवण्यास मदत होते. याशिवाय मंदावलेली भूक वाढण्यास देखील मदत होते. विशेष म्हणजे रात्री झोप येत नाही म्हणून तुम्हाला डॉक्टरांनी चहा, कॉफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला असेल, तर तुम्ही रात्रीच्या वेळी हे पेय पिऊन झोपू शकता.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
