नवी मुंबई : पावसाळ्यात रेल्वेगाड्या अनेकदा धीम्या गतीनं सुरू असतात. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून हा निर्णय घेतला जातो. त्यात जर रेल्वे मार्गावर कामानिमित्त ब्लॉक घेण्यात आला तर मात्र गाड्यांचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडतं. आता मध्य रेल्वेच्या कामांना सुरूवात झालीये. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) इथं पायाभूत कामांसाठी 1 ते 30 जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे 30 जूनपासून पूर्ण महिनाभर मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंतच धावतील आणि पनवेलवरूनच सुटतील. कोकणवासीयांसाठी या दोन्ही गाड्या महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आता या ब्लॉकचा फटका मुंबईत राहणाऱ्या कोकणवासियांना आणि कोकणात जाणाऱ्या इतर प्रवाशांना बसणार आहे.
advertisement
कोकण रेल्वेच्या प्रवाशांना गेल्या काही काळापासून हाल सोसावे लागताहेत. काही गाड्या अनेक तास उशिरानं धावतात, त्यात नुकतंच सीएसएमटी इथं घेण्यात आलेल्या 36 तासांच्या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेकडून मुंबईत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामानिमित्त कोकणात जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. तर, आता एलटीटीच्या यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल, दुरुस्ती करणाऱ्या मर्यादित मार्गिकेचं (पिट लाइन) काम करण्यात येणार आहे.
हेही वाचा : भोर-महाड मार्गावरील वरंधा घाट रस्ता दरड कोसळून खचला! अवजड वाहतूक बंद
याचा परिणाम म्हणून मत्स्यगंधा एक्सप्रेस 30 जून ते 30 जुलै या कालावधीत पनवेलपर्यंतच धावेल. गाडी क्रमांक 16346 तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दैनंदिन नेत्रावती एक्स्प्रेस 30 जून ते 30 जुलै या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनसऐवजी पनवेल स्थानकातच थांबेल. तसंच गाडी क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम दरम्यान धावणारी दैनंदिन नेत्रावती एक्स्प्रेस 1 ते 30 जुलै अशी संपूर्ण महिनाभर पनवेल इथूनच आपला प्रवास सुरू करेल.
दरम्यान, सध्या कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानं रेल्वेगाडीला दोन डबे वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय कोकण रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित होण्यास मदत होईल. तर, हिसार-कोयंबतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला द्वितीय आणि तृतीय वातानुकूलित डब्याचा तात्पुरता प्रत्येकी 1 डबा वाढवण्यात येणार आहे, असा निर्णय कोकण रेल्वेनं घेतला आहे.