बोला पुंडलिक वरदे...! पालखी निघणार, सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल
- Published by:Isha Jagtap
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
वारकरी पायी पंढरपूरची वाट चालत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोणतीही कोंडी होऊ नये यासाठी पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : आता सर्व वारकरी, भाविक देहभान हरपून पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करतील. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान शुक्रवार, दिनांक 28 जून रोजी देहूतील इनामदार साहेब वाडा इथून नियोजित आहे. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान शनिवार, दिनांक 29 जून रोजी आळंदीहून होईल. या पालखी सोहळ्यांनिमित्त ठिकठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
advertisement
सोलापूर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 11 जुलै 2024 रोजी, तर नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत 12 जुलै 2024 रोजी आणि तुकाराम महाराजांची पालखी अकलुज पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश करेल. या दोन्ही सोहळ्यांमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक सहभागी होतील. वारकरी पायी पंढरपूरची वाट चालत असतात. त्यामुळे पालखी मार्गावर वाहतुकीची कोणतीही कोंडी होऊ नये यासाठी 9 जुलै ते 18 जुलै या कालावधीत अकलुज व पंढरपूर मार्गांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
advertisement
जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951च्या कलम 33 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारान्वये हा आदेश पारित केला आहे. पंढरपूरकडून पुण्याकडे जाणारी वाहनं वाखरी-साळमुख फाटा-पिलीव-म्हसवड-फलटण किंवा पंढरपूर-टेंभुर्णी पर्यायी मार्गानं जातील. तर, पुणे-फलटणकडून पंढरपूरकडे येणारी वाहनं फलटण-म्हसवड-पिलीव-साळमुख चौक-पंढरपूर किंवा पुणे-टेभुर्णी मार्गे पंढरपूरकडे येतील. तसंच वेळापूर इथून पंढरपूरला येणारी वाहनं साळमुख चौक-सातारा रोड या पर्यायी मार्गानं येतील.
advertisement
सांगोला इथून पुण्याला जाणारी वाहनं (जड वाहतूक वगळून) सांगोला-साळमुख चौक वेळापूर-अकलुज-इंदापूर या पर्यायी मार्गानं येतील. पुण्याहून इंदापूर मार्गे पंढरपूरला येणारी वाहनं टेंभुर्णी-पंढरपूर या पर्यायी मार्गानं येतील. अकलूजहून पंढरपूर मार्गे सोलापूरकडे जाणारी वाहनं अकलूज-टेंभुर्णी या पर्यायी मार्गानं जातील. सोलापूरहून पंढरपूर मार्गे अकलूजकडे जाणारी वाहनं सोलापूर-टेंभुर्णी-अकलूज या पर्यायी मार्गानं जातील.
ही बदलेली वाहतूक व्यवस्था 9 जुलै 2024 रोजी 00.01 वाजल्यापासून 18 जुलै 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरू असेल. त्यामुळे या काळात दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर प्रवाशांनी करावा, असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केलं आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
June 28, 2024 10:14 AM IST