नेमकं काय घडलं होतं?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे ५ एप्रिल २०१४ रोजी बुलढाणा जिल्ह्यात आले होते. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारासाठी त्यांनी त्या दिवशी विविध सभा घेतल्या. दिवसभराचा कार्यक्रम आटोपल्यानंतर रात्री त्यांनी बुलढाण्यातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी, म्हणजे ६ एप्रिल २०१४ रोजी सकाळी, त्यांना अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि दर्यापूर येथे प्रचार सभांसाठी जायचे होते. या दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने प्रवास करण्याचे नियोजन करण्यात आले होते.
advertisement
सकाळी साडे दहाची वेळ
बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिराच्या प्रशस्त मैदानावर तात्पुरता हेलिपॅड तयार करण्यात आला होता. सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्टरचे उड्डाण नियोजित होते. मात्र प्रचारादरम्यान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात वेळ गेल्यामुळे अजित पवार नियोजित वेळेपेक्षा उशिरा, सुमारे १० वाजून ५० मिनिटांनी हेलिकॉप्टरमध्ये बसले. काही क्षणांतच हेलिकॉप्टरने आकाशात झेप घेतली आणि उपस्थितांनी पुढील दौऱ्यासाठी त्यांना निरोप दिला.
पायलटच्या चूक लक्षात आली
मात्र, उड्डाणानंतर काही मिनिटांतच हेलिकॉप्टरच्या गिअर बॉक्समध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बाब पायलटच्या लक्षात आली. ही बाब अत्यंत गंभीर होती, कारण गिअर बॉक्समधील दोषामुळे कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने क्षणाचाही विलंब न करता हेलिकॉप्टर परत फिरवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या कौशल्याने आणि सतर्कतेने त्याने हेलिकॉप्टर पुन्हा सहकार विद्या मंदिरच्या हेलिपॅडवर उतरवले.
अन् संकट टळलं
हेलिकॉप्टर सुरक्षितरीत्या जमिनीवर उतरले तेव्हा घड्याळात १० वाजून ५८ मिनिटे झाली होती. अजित पवार हेलिकॉप्टरमधून सुरक्षित बाहेर पडताच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही क्षणांपूर्वी टळलेल्या मोठ्या संकटाची जाणीव सर्वांनाच झाली होती. पायलटच्या सतर्कतेमुळे आणि वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे बारा वर्षांपूर्वी हा अनर्थ टळला होता.
