मोबदल्यात फक्त 10 एकर जमीन आणि काही रक्कम मिळाली, मात्र ती जमीन झुडपांनी व्यापलेली होती. त्यामुळे नव्या जमिनीवर शेती करणे म्हणजे नव्याने जीवन उभारण्याइतकं कठीण काम ठरलं. कोरडवाहू भागामुळे रब्बी पिकं घेणं शक्य नव्हतं. सोयाबीन, कपाशी अशी पारंपरिक पिकं पावसावरच अवलंबून होती. जनावरांसाठी चारा नसल्याने दुग्धव्यवसायही बंद पडला. तरीही राहुल बेलसरे यांनी हार मानली नाही. कृषी विभागाच्या माध्यमातून नव्या संधींचा शोध घेत राहिले.
advertisement
गांडूळखताचा पहिला प्रयोग
2006- 07 मध्ये त्यांनी कृषी विज्ञान केंद्र, घातखेड येथे आयोजित प्रशिक्षण घेतलं आणि घरच्या शेणावर आधारित पहिला गांडूळखत बेड तयार केला. सुरुवातीचे परिणाम पाहून त्यांनी तोच मार्ग स्वीकारला. घरचं खत म्हणजे भूमीचं आरोग्य वाढवणारं औषध, असा त्यांचा विश्वास आजही आहे.
सायकलवरून अनेक गावात प्रचार
पहिल्या काही वर्षांत राहुल स्वतः अमरावतीला एसटीने गांडूळखताच्या पिशव्या घेऊन जात. सायकल भाड्याने घेऊन नागरी भागात घराघरांत जाऊन लोकांना सेंद्रिय खताचं महत्त्व समजावून सांगत. परसबागांसाठी त्यांनी 1 किलोच्या पिशव्या विक्रीस ठेवल्या आणि दोन वर्षांतच भूमिरत्न या नावाने ग्राहकांचा विश्वास जिंकला.
गावागावांतून विक्रीचा विस्तार
यानंतर त्यांनी शेतकऱ्यांमध्ये थेट प्रचार सुरू केला. तिवसा, वरुड, मोर्शी आणि धामणगाव रेल्वे तालुक्यातील शेतांपर्यंत त्यांनी नमुने देत, प्रात्यक्षिकं दाखवत विश्वास निर्माण केला. संत्रा पट्ट्यातील बागायतदारांनी या खताला प्रतिसाद दिला आणि त्याच क्षणापासून भूमिरत्न या ब्रँडला उभारी मिळाली.
राहुल यांची व्यवसायातील भरारी
आज राहुल यांच्याकडे एकूण 120 बेड्स असून, दरवर्षी 70 ते 80 टन गांडूळखत निर्मिती करतात. पाच व दहा किलोच्या पॅकिंगमधून परसबागांसाठी, तर 40 किलोच्या पिशव्यातून शेतीसाठी विक्री केली जाते. सोबतच व्हर्मिवॉश (100 रुपये प्रति लिटर) आणि भूमिरत्न गांडूळखत (400 रुपये प्रति किलो) या उत्पादनांना उत्तम मागणी आहे. वर्षभरात पाच बॅचेस आणि अंदाजे 40 टक्के नफा मिळतो.
स्वतःच्या कल्पनेतून मोटरवर चालणारी चाळणी यंत्रणा विकसित
खत चाळणी प्रक्रियेसाठी त्यांनी स्वतःच्या कल्पनेतून मोटरवर चालणारी चाळणी यंत्रणा विकसित केली आहे. त्यामुळे दिवसाला 20 बेडपर्यंत प्रक्रिया होते आणि 18 मजुरांचं मनुष्यबळ वाचतं. हीच त्यांची नाविन्यता ग्रामीण उद्योगाला टिकवून ठेवते. चांदूर रेल्वे-अमरावती मार्गावर त्यांच्या शेतानजीक त्यांनी स्वतःचं सेंद्रिय खत व महिला बचत गट उत्पादन विक्री केंद्र उभारलं आहे. येथे भूमिरत्नसह स्थानिक शेतकऱ्यांचा सेंद्रिय मालही विक्रीस ठेवून त्यांनी इतरांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे.