प्रियांका रवींद्र राठोड असं या महिलेचं नाव असून (वय 30, रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर, जि. जळगाव) या गेल्या अनेक महिन्यांपासून भोकरदन येथील नाजा पाटील यांच्या वीटभट्टीवर काम करत आहेत. रविवारी रात्री 8 ते 9 च्या दरम्यान या गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिचे पती बाहेरगावी असल्याने, महिलेचा मामेभाऊ शाहरुख तडवीने तिला दुचाकीवर बसवून भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत होते.
advertisement
रस्त्यातच त्या महिलेच्या पोटात वेदना खूप वाढल्या आणि महिलेने दुचाकी थांबवायला सांगून त्या रस्त्यावर बसल्या. याच वेळी रस्त्यावरून भोकरदन पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत उबाळे जात होते. त्यांनी गाडी थांबवून काय झाले हे पाहिले असता, महिला प्रसूती वेदनांनी त्रस्त झालेली होती. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावली. मात्र, रुग्णवाहिका येण्यापूर्वीच परिचारिका दीक्षा रायपुरे, सुनंदा राऊत, गजानन पवार आणि पोलीस कर्मचारी प्रशांत उबाळे यांनी जवळच्या घरातून चादर मागवली आणि रस्त्यावरच तिची सुखरूप प्रसूती केली.
महिलेने गोंड्स मुलीला जन्म दिला असून त्यांना ही दुसरी मुलगी आहे. राठोड दाम्पत्याला पहिली सुद्धा मुलगीच आहे. प्रसुतीनंतर बाळाला आणि त्या महिलेला उपस्थित नागरिकांनी रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दोघांचीही प्रकृती चांगली असून, त्यांना सोमवारी पुढील उपचारासाठी जालना येथे हलविण्यात आले आहे. दुचाकीवर जात असताना महिलेला प्रसुती वेदना सुरू झाल्याने अखेर काही वेळ रस्त्यावर थांबण्याचा निर्णय महिलेने घेतला. ग्रामीण रूग्णालय जवळच होते. मात्र, रूग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी काही अंतर जावे लागणार होते. मात्र, महिलेला प्रचंड वेदना सुरू झाल्या. यामुळे रस्त्यावरच प्रसूती करण्यात आले.
