हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिली अपडेट
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार समुद्रात वारं फिरल्यामुळे महाराष्ट्रात अचानक आज पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मराठवाड्यात मागच्या 48 तासात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. मुंबईसह पश्चिम महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात ढगाळ वातावरण होतं. मात्र पहाटेपासून पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. मोंथा चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात लॅण्डफॉल करुन आता ते कमजोर होऊन डिप डिप्रेशन स्थितीमध्ये रुपांतरीत झालं आहे. पुढचे 6 तास ते किती कमजोर होतं याकडे हवामान विभागाचं लक्ष असणार आहे. मराठवाडा आणि विदर्भासाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटांसह अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
1 नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पावसाचं संकट
आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तळ कोकण विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. आज महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 31 ऑक्टोबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 1 नोव्हेंबरपासून पावसाचा जोर कमी होईल. हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. खोल समुद्रात मच्छिमारांना न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 3 नोव्हेंबरपासून पावसाचा कोणताही इशारा हवामान विभागाने दिलेला नाही. त्यामुळे थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रार वारं फिरलं
हवामान तज्ज्ञ अमित कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे विदर्भासोबतच कोकण किनारपट्टीला देण्यात आलेले पावसाचे इशारे कायम असून, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शुक्रवारी कोकणकिनारी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाऱ्याचा वेग आणि खवळलेल्या समुद्राच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकण किनारपट्टीला दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, मुंबईसह लगतच्या किनारपट्टीवरील मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्या आहेत. या दोन प्रणालींच्या एकत्रित परिणामामुळे ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यभर ढगाळ वातावरण राहून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पावसानं मोठं नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐन हिवाळ्यात पाऊस पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.. मुसळधार पावसामुळे काढणीला आलेल्या पिकाला फटका बसला आहे. लातूरमध्येही अचानक झालेल्या पावसामुळे काढलेल्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेला घास हिसकावल्याने शेतकरी आक्रोश करत आहेत. तर रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
