दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा
या हवामान बदलाचा थेट परिणाम दक्षिण भारतावर होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर २१ व २२ नोव्हेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये २१ ते २६ नोव्हेंबर, केरळ आणि माहेमध्ये २१ ते २३ नोव्हेंबर, तसेच किनारी आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये २६ नोव्हेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. गेल्या २४ तासांतही तामिळनाडूच्या काही भागांत ७ ते २० सेंटीमीटरपर्यंत अतिवृष्टी झाली असून, या भागात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य भारतात थंडीची लाट आणि महाराष्ट्राचे हवामान
एकीकडे दक्षिणेत पावसाचा जोर असताना, देशाच्या मध्य भागातील हवामानात फरक जाणवत आहे. पश्चिम मध्य प्रदेशात २१ आणि २२ नोव्हेंबर रोजी शीत लहरीची (Cold Wave) स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, यानंतर थंडी कमी होऊन हवामानात सुधारणा होईल. पुढील चार दिवसांत मध्य भारतातील किमान तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सियसने वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे थंडीचा प्रभाव थोडा कमी होईल.
महाराष्ट्रात कसं राहील हवामान?
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसची वाढ अपेक्षित आहे. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमारेषेवर असलेल्या गावांमध्ये थंडीचा कडाका कायम राहणार आहे. चार दिवसांनी किमान तापमानात २ ते ४ अंश सेल्सियसची वाढ होईल, तर उत्तर-पश्चिम भारतातील मैदानी भागात पुढील २४ तासांत तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, त्यानंतर पुढील सहा दिवसांत या भागात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंश सेल्सियसची घट होण्याची शक्यता आहे, म्हणजेच उत्तरेकडे पुन्हा थंडी वाढू शकते.
महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट
महाराष्ट्रातही काही भागामध्ये तुरळक पावसाचा अंदाज येत्या ८ दिवसात राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. हवामानात वेगानं बदल होत आहेत. मुंबईतील गारेगार वातावरण कायम असून गुरुवारी किमान तापमान १७ अंश सेल्सिअस होते. तर ठाण्याचे २० अंश नोंदवण्यात आले. उत्तरोत्तर यात आणखी वाढ होईल आणि हे तापमान २० ते २२ अंशादरम्यान नोंदवण्यात येईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली.
