ईश्वरलाला चौधरी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. 21 वर्षीय ईश्वरलाल हा विवाहित होता, तो काचिपुरा चौकातील मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहत होता. ईश्वरलालचे लग्नानंतरही तरूणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र काही महिन्यानंतर तरूणी त्याच्याकडे पैशाची मागणी करत लग्नासाठी दबाव टाकू लागली. त्यामुळे ईश्वर तणावात होता. 1 ऑक्टोबरला ईश्वरने हॉस्टेलच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
advertisement
चिठ्ठीत पंतप्रधानांना विनंती काय केली?
ईश्वरने आत्महत्येपूर्वी लिहिलेली दोन पानी चिठ्ठी व त्याचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. ईश्वरने लिहिलेल्या चिठ्ठीत पंतप्रधानांना विनंती केली आहे. भारतात सर्वांसाठी कायदा सारखाच असायला हवा. मुली कायद्याचा गैरफायदा घेत आहेत. माझ्यासोबत ज्यांनी चुकीचे केले, त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. न्यायालयावर माझा विश्वास आहे, असे पत्र पंतप्रधानांना म्हटले आहे.
ईश्वरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काय म्हटले?
मी ज्यांना मदत केली त्यांनी माझ्या आई-वडिलांना मदत करा, माझी कमतरता भासू देऊ नका...मी आत्महत्या केल्यानंतर माझे सॅड स्टेटस ठेऊ नका. त्याने काहीही होणार नाही. मी एकुलता एक मुलगा आहे. मी हरलो आहे. मी चुकीचे पाऊल उचलत आहे. याची शिक्षा माझ्या नातेवाइकांना भोगावी लागेल , असे ईश्वरने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
पत्नीचे तरूणीवर गंभीर आरोप
या प्रकरणी पोलिसांनी ईश्वरच्या पत्नीचा देखील जबाब नोंदवला. तरूणी ईश्वरवर लग्नासाठी दबाव टाकत होती, त्याचा मानसिक छळ देखील करत होती. तसेच मी मुलगी आहे, तुझे कोणी ऐकणार नाही, न्यायव्यवस्था माझ्या बाजूने आहे , अशी धमकी सातत्याने देत होती, असे ईश्वरच्या पत्नीने जबाबात म्हटले आहे. सुसाईड नोट आणि पत्नीच्या जबाबानंतर तरुणीविरोधात ब्लॅकमेल आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.