मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे आई-वडील विभक्त झाले आहेत. यामुळे या चारही मुलींचा सांभाळ दूरचे नातेवाईक करत होते. सांभाळ करण्यासाठी दिलेल्या पालनकर्त्यानेच चार सख्ख्या बहिणींवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या संदर्भात पती पत्नीला अटक केली आहे.
असा झाला पर्दाफाश
पीडित मुलींपैकी एका मुलीचं ४ महिन्यांपूर्वी लग्न झाले होतं. लग्नानंतर काही दिवसांपूर्वी ती आपल्या बहिणींना भेटण्यासाठी पुन्हा राहुरीला आली होती. यावेळी आरोपीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला. त्यानंतर त्या दोघांनी तातडीने स्नेहालय या संस्थेशी संपर्क साधला. चार बहिणींवर सुरू असलेल्या अत्याचाराची त्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
advertisement
या चारही मुली आई वडील विभक्त झाल्यापासून या नातेवाईकाकडे राहत होत्या. तेव्हापासून आरोपीनं अनेकदा या चारही मुलींवर अत्याचार केला आहे. पण या चौघींना कुणाचाच आधार नव्हता. त्यामुळे त्या मुली आरोपीचा अत्याचार निमूटपणे सहन करत होत्या. आता अखेर चारपैकी सर्वात मोठी मुलीचं लग्न झाल्यानंतर तिने हिंमत करून याची माहिती आपल्या पतीला दिली. यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. पीडित अल्पवयीन मुलींमध्ये विवाहित तरुणीसह एक मुलगी १६, दुसरी १४ व तिसरी १० वर्षांची आहे. या प्रकरणी पोलिसांनी पालनकर्त्या जोडप्यावर गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे.
