मिहिरा रोज नियमितपणे वॉर्मअप, रनिंग, जंपिंग आणि व्यायाम करते. मला हा खेळ खूप आवडतो. मी रोज एक्सरसाईज करते. पुढे जाऊन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचे आहे, असे ती आत्मविश्वासाने सांगते. विशेष म्हणजे, मिहिराला सर्वांचा आवडता अभिनेता अक्षय कुमार याला भेटण्याची संधीही मिळाली असून, त्यामुळे तिचा उत्साह आणखी वाढला आहे.
advertisement
मिहिराची ही क्रीडा वाटचाल आर. डी. स्पोर्ट्स अकॅडमीपासून सुरू झाली. सुरुवातीला फन अँड फिटनेससाठी ती अकॅडमीमध्ये येत होती. मात्र, तेथील प्रशिक्षकांनी तिची ताकद, शिस्त आणि खेळावरील ओढ ओळखली. तिच्या हालचाली, स्पीड आणि स्टॅमिनामध्ये वेगळेपण दिसत होते. हळूहळू तिची वेटलिफ्टिंगकडे आवड वाढत गेली, असे कोच ऋषी दुबे सांगतात.
कोच दुबे पुढे म्हणाले, आम्ही पाच वर्षांच्या मुलांसाठी फन अँड फिटनेसचे प्रशिक्षण देतो. त्यातून स्पीड, स्ट्रेंथ आणि स्टॅमिना तयार केला जातो. ज्यांच्याकडे अधिक स्पीड आणि ताकद असते, त्यांना योग्य खेळासाठी मार्गदर्शन केले जाते. मिहिराला गेल्या एका वर्षापासून वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण देत आहोत. तिने खासदार चषक, झेडपी स्पर्धा आणि देसाई कॉलेज येथे आयोजित स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे.
मिहिराच्या यशामागे तिच्या पालकांचा मोलाचा पाठिंबा आहे. ती मनापासून सराव करते. पालक म्हणून आम्हाला तिचा अभिमान वाटतो. तिने पुढेही हेच चालू ठेवावे, अशी आमची मनापासून इच्छा आहे, असे तिचे वडील गोविंद गांगुर्डे यांनी सांगितले.
अवघ्या सहा वर्षांच्या मिहिराने दाखवलेली मेहनत, शिस्त आणि ध्येयवेडेपणा आज अनेक मुलांसाठी आणि पालकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. भविष्यात मिहिरा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करेल, अशी अपेक्षा सर्वांनाच आहे.





