अहमदनगर : 'टाळी एका हातानं वाजत नाही' ही मराठीतील म्हण प्रसिद्ध आहे. पण, ही म्हण खोटी ठरवण्याची किमया एका अंध तरूणानं करून दाखवलीय. तब्बल बारा वर्षे मेहनत करून त्याने एका हातानं टाळी वाजवण्याची कला आत्मसात केली आहे. 'इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये त्याच्या या कलेची नोंद झाली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अस्तगाव येथील छोट्याशा गावात राहणारा राहुल पेटारे हा जन्मतः अंध आहे. अंध असलेला हा तरुण त्याच्या आगळ्या-वेगळ्या कलेमुळे सध्या चर्चेत आहे. त्याची ही किमया अनेकांना अचंबित करून जाते. बबन पेटारे यांना दोन मुले आणि एक मुलगी असून ते जन्मतः अंध आहेत. एका मुलाला त्यांनी दत्तक घेतले असून तोही अंध आहे. परिस्थिती गरीबीची असतानाही मुलांचा मोठ्या जिद्दीनं हा परिवार सांभाळ करत असून राहुलचं कलेक्टर होण्याचं स्वप्न आहे.
advertisement
यापूर्वी, वर्धा जिल्ह्यातील रोशन संजय लोखंडे या तरुणाने एका हाताने 30 सेकंदात 180 पेक्षा अधिक टाळ्या वाजवण्याचा विक्रम केला आहे. त्याचीही दखल 'इंडिया बुक ऑफ रेकार्ड' या संस्थेने घेतली आहे. आजच्या काळातही तरुण अनेक कलागुणांनी भरलेले असतात. त्यामुळेच त्यांच्या डोक्यात नवनवीन संकल्पना सुरू असतात आणि काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द असते. यातून अशा पद्धतीनं पूर्वापार पडलेल्या म्हणी देखील खोट्या ठरू शकतात.
