अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजुने टीका होऊ लागली आहे. ते उमेदवारांना दमदाटी केल्याचा आरोप होऊ लागला आहे. माळेगावमधील ही सभा चर्चेत असताना अजित पवार पुन्हा एकदा संतापले आहेत. अजित पवार आज जालना दौऱ्यावर आहेत. परतूर नगर परिषदेसाठी त्यांची आज सभा आहे. मात्र ही सभा सुरू व्हायच्या आधी अजित पवार थेट पोलिसांवरच संतापले.
advertisement
सभास्थळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बसवण्यासाठी खुर्च्या न दिल्याच्या कारणातून अजित पवारांचा संताप अनावर झाला. ते व्यासपीठावरून उठले आणि थेट हातात माईक घेऊन पोलिसांना झापलं आहे. तसेच स्टेजच्या समोरच्या बाजुला खुर्च्या लावून उमेदवारांना बसण्यासाठी व्यवस्था करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. अजित पवारांचा हा व्हिडीओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
"मला पोलिसांना सगळ्यांना सांगायचं आहे, माझे जे उमेदवार आहेत, त्यांच्या खुर्च्या स्टेजच्या समोर लावा. मी सांगतोय आणि त्यांना इथं बसवा... अरे काढ ना ते... खुर्च्या घे... कळत नाहीये का?" अशा शब्दांत अजित पवारांनी पोलिसांसह कार्यकर्त्यांवर संतापले.
माळेगाव येथील सभेमुळे अजित पवार आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांनी थेट सभास्थळी पोलिसांना सुनावलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. खरं तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी राज्यभर दौरा सुरू केला आहे. जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. अशात पहिल्या दोन्ही सभांमध्ये केलेल्या विधानांमुळे अजित पवार चर्चेचा विषय ठरत आहेत.
