अजित पवार नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांचा पक्ष कोकणातील नेत्याकडून हायजॅक करण्यात आलाय. आता पक्षावर अजित पवारांचं नियंत्रण राहिलं नाही, अशा भाषेत रोहित पवारांनी टीका केली होती. या टीकेबाबत विचारलं असता अजित पवार म्हणाले, "आम्ही आमच्या पक्षात काय करावं, हे बाकीच्यांनी फुकटचा सल्ला देण्याची गरज नाही. त्यांनी त्यांच्या पक्षाचं बघावं. काहींना असं वाटायला लागलं की आपण फारच मोठे नेते झालो. सगळा महाराष्ट्राचा मक्ता त्यांनाच दिलाय, असं काहीजण वागत आहेत. पण ठीक आहे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु ज्यांनी आपला पक्ष सांभाळावा, इतर पक्षांच्या कामात नाक खुपसायचं काही कारण नाही."
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या नेत्याला मारहाण केली होती. पावसाळी अधिवेशनात तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे रमी गेम खेळताना आढळले होते. यानंतर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या टेबलवर पत्ते टाकून निषेध नोंदवला होता. या प्रकारानंतर सूरज चव्हाण आणि त्यांच्या काही साथीदारांनी छावा संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली होती. या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
मात्र या घटनेला महिनाही उलटत नाही, तोपर्यंत पुन्हा सूरज चव्हाण यांना पक्षात घेतलं आहे. तटकरे यांच्या उपस्थितीत सूरज चव्हाणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती देण्यात आली. यावेळी अजित पवार उपस्थित नव्हते. यावरून रोहित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कारभारावर भाष्य केलं होतं. सुनील तटकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत कोकणातील एका नेत्याने अजित पवारांचा पक्ष हायजॅक केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. रोहित पवारांच्या या वक्तव्याचा आता अजित पवारांनी समाचार घेतला आहे.