रात्री उशिरा अजित पवारांचं पार्थिव बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणात आणलं होतं. इथेच त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. दरम्यान, अजित पवारांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण बारामती विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जमली आहे. येथील आख्खं मैदान लोकांनी भरलं असून तिथे उभं राहायला देखील जागा नाही. इथं रात्रभर लोक जागे होते. ते घरी देखील गेले नाहीत. त्यांनी आख्खी रात्र जागून काढली.
advertisement
आता घटनास्थळाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये लोकांची अलोट गर्दी बघायला मिळत आहे. सगळ्याच्या चेहऱ्यावर आपला घरातला माणूस गेल्याचं दु:ख स्पष्टपणे दिसून येत आहे. अजित पवारांच्या आठवणी फक्त राजकीय नेत्यांसोबतच नव्हत्या. तर बारामतीतील अगदी सामान्य माणसासोबत देखील त्यांचा कनेक्ट होता. यामुळे अनेकजण अजित पवारांच्या आठवणी सांगताना, चर्चा करताना दिसले.
आज सकाळी ११ वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. देशातील सर्वपक्षीय नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीतील गदिमा सभागृह येथून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेमका अपघात कसा झाला?
ज्यावेळी विमान बारामतीत पोहोचलं तेव्हा बारामतीत दाट धुकं होतं. धावपट्टी दिसत नव्हती. बारामती सारख्या लहान विमानतळाच्या धावपट्टीवर ILS सिस्टम उपलब्ध नव्हती. यामुळे दाट धुकं असताना विमान उतरवताना पायलटला मॅन्युअल पद्धतीने विमान उतरावं लागतं. पण धावपट्टीच दिसत नव्हती. तरीही पायलटने पहिल्यांदा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हे विमान पुन्हा आकाशात झेपावलं. आकाशात एक मोठी घिरटी घालून आणि धावपट्टीचा अंदाज घेऊन हे विमान पुन्हा लँडींग करायला आलं.
दुसऱ्यांदा लँडींग करताना विमान यशस्वीपणे उतरेल असा अंदाज होता. मात्र तसं झालं नाही. एक्सपर्टने दिलेल्या माहितीनुसा, हे विमान थेट धावपट्टीवर जाण्याऐवजी मार्ग सोडून बाजुला गेलं. पायलटने विमान धावपट्टीवर आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यात पायलटला अपयश आलं आणि पुढच्या ४ ते ५ सेकंदात विमानाचा मोठा स्फोट घडून अपघात झाला.
ज्या विमानतळावर ILS सिस्टमची सुविधा नसते, अशा विमान तळावर वैमानिकांना आपल्या डोळ्यांनी पाहून धावपट्टीचा अंदाज घ्यावा लागतो. पण सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं असल्याने वैमानिकाला हा अंदाज घेता आला नाही. पहिलं लँडींग फसल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न करण्यात आला. पण यात अजित पवारांसह विमानातील पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला.
अपघातापूर्वी पायलटने MAYDAY कॉल केला होता. DGCA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामतीतील विमान तळ Table Top Runway प्रकारचं आहे. हे विमान धावपट्टीवर येत असताना यशस्वी लँडींग होईल असं वाटलं होतं. मात्र जमीनीपासून १०० फूट अंतरावर असताना विमानाचं संतुलन बिघडलं. विमान धावपट्टीवर पोहचण्याआधीच जमिनीला धडकलं. यानंतर मोठा आवाज आला आणि चार ते पाच स्फोट घडले. या अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने विमानतळाच्या दिशेनं धाव घेतली. मात्र आगीच्या ज्वाळा प्रचंड असल्याने कुणालाही वाचवता आलं नाही.
