सोलापूर: करमाळ्यातील महिला डीवायएसपी आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट फोनवरून दम दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आता नवा ट्वीस्ट आला आहे. अजित पवारांना फोन लावून देणं आणि त्यानंतर आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या चर्चेचा व्हिडीओ व्हायरल करणे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना महागात पडलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 15 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
कुर्डुवाडी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कार्यकर्त्यांनी अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी सुरू असलेल्या पोलिसी कारवाईत अडथळे आणले. तसेच सरकारी कामात हस्तक्षेप केला. या प्रकरणात 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता बाबा जगताप यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री स्तरावरील व्यक्तीने थेट पोलीस अधिकाऱ्याला अशा प्रकारे फोन करणे आणि दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे, पवार समर्थकांनी मात्र यामध्ये काहीही गैर नसल्याचा बचाव केला आहे.
सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पुढील कारवाईबाबत उत्सुकता वाढली आहे. करमाळ्यातील अवैध उत्खनन आणि त्यातून निर्माण झालेल्या राजकीय-सामाजिक गदारोळामुळे हे प्रकरण अजून चांगलेच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या. मात्र स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. आत्ताच्या आत्ता कारवाई थांबवा, असा आदेश अजित पवार यांनी दिला. त्यावेळी मी आपल्याला ओळखले नाही. तुम्ही माझ्या नंबरवर व्हिडीओ कॉल करा, असे अंजना कृष्णा अजित पवार यांना म्हणाल्या. त्यावर तुमच्यात एवढी हिम्मत आली... तुमच्याविरोधात मी कारवाई करेन, असा दम अजित पवार यांनी दिला. दोघांमधल्या संवादाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.