राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष , उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात शेतकरी मेळाव्यासाठी आले होते. त्यावेळी वेळात वेळ काढून त्यांनी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. कुटुंबियांची विचारपूस करून त्यांचा पाहुणचारही घेतला.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे काका अरूण तनपुरे यांनी हजारो समर्थकांसह अजित पवार गटात प्रवेश केला आहे. आज कार्यक्रमानंतर अजित पवार तनपुरे कुटूंबीयांच्या भेटीला घरी पोहचले तेव्हा त्यांचे स्वागत प्राजक्त तनपुरे यांनी केले. अजित पवारांनीही माजी खासदार प्रसाद तनपुरे यांची सदिच्छा भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी तनपुरे कुटूंबीयांशी अजित पवार यांनी काही राजकीय चर्चा केली का? असे विचारले असता प्राजक्त तनपुरे यांनी यावर बोलण्यास नकार दिला. कौटुंबिक भेट होती, असे तनपुरे यांनी सांगितले.
advertisement
प्राजक्त तनपुरे यांचा विधानसभेत पराभव
प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विधानसभा निवडणूक २०२४ ला राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप नेते शिवाजीराव कर्डिले यांनी प्राजक्त तनपुरे यांना पराभूत केले.