समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास नांदेडच्या सिडको परिसरात ही घटना घडली. जीवन घोगरे पाटील हे कामानिमित्त घराबाहेर पडले असताना चारचाकी वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सिडको भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली असून त्याचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे.
advertisement
अपहरणानंतर बेदम मारहाण
अपहरणानंतर जीवन घोगरे पाटील यांना अज्ञात ठिकाणी नेऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मारहाणीमुळे ते गंभीररीत्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली असून ते सध्या सुरक्षित असल्याची माहिती आहे. घटनेनंतर जीवन घोगरे पाटील यांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी
या अपहरणामागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून वैयक्तिक वाद, राजकीय वैमनस्य की अन्य काही कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. तसेच घटनास्थळाच्या परिसरात सखोल चौकशी करून प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले जात आहेत. दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्याचे अपहरण झाल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
