Pune SPPU Jobs: पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; प्राध्यापक पदाच्या 111 जागा, लगेच करा अर्ज
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये रिक्त असलेल्या १११ प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासनाने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागांमध्ये काम करण्याची संधी शोधणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये रिक्त असलेल्या १११ प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रशासनाने पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आता ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे जास्तीत जास्त पात्र उमेदवारांना या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयानुसार, ज्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत, त्यांना अर्जाची छापील प्रत आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे विद्यापीठाच्या 'प्रशासन शिक्षक कक्षा'कडे जमा करण्यासाठी ७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेमध्ये एकूण १११ पदांचा समावेश आहे. त्यामध्ये ४७ पदे सहायक प्राध्यापक, ३२ पदे सहयोगी प्राध्यापक आणि उर्वरित ३२ पदे प्राध्यापक या संवर्गातील आहेत. विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शैक्षणिक कामकाजावर ताण येत होता, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने या भरतीला मान्यता दिली आहे. उमेदवारांची निवड ही विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राज्य शासनाच्या निकषांनुसार केली जाणार आहे. यासाठी नेट/सेट किंवा पीएचडी यांसारखी शैक्षणिक पात्रता अनिवार्य आहे. मुदतवाढीचा हा निर्णय प्रामुख्याने तांत्रिक अडचणींमुळे किंवा कागदपत्रांच्या उपलब्धतेमुळे अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांचा विचार करून घेण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावरून या अर्जाची प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 22, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune SPPU Jobs: पुणे विद्यापीठात नोकरीची सुवर्णसंधी; प्राध्यापक पदाच्या 111 जागा, लगेच करा अर्ज









