राज्यभरातील महानगरपालिका निवडणुका दोन महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्यादृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेत बऱ्याचशा जागांवर भाजप विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आमनेसामने येण्याची शक्यता आहे. भाजपचा हिंदुत्ववादी मतदार टिकविण्यासाठी आटापीटा सुरू आहे तर अल्पसंख्यांकाचे मतदान आपल्या बरोबर राहावे यासाठी अजित पवार यांची राष्ट्रवादी कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन महिन्यांनी निवडणूक असली तरी दिवाळीतच राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे.
advertisement
पुण्यात महायुतीच्या वादाचा दुसरा अंक
पुण्यात महायुतीच्या वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाडा येथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा आरोप केला. तसेच शनिवार वाड्याबाहेरील मजार हटवावी, या मागणीसाठी आंदोलन केले. मात्र या आंदोलनाच्या विरोधातच आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत कुलकर्णी यांच्याविरोधात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली. मेधा कुलकर्णी यांच्या विरोधात सोमवारी दुपारी चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शनिवार वाडा येथे आंदोलन करणार आहे.
रुपाली पाटील यांनी मेधा कुलकर्णी यांना सुनावले
भाजपने मेधा कुलकर्णी यांना समज द्यावी. खरे तर त्यांना आवरावे कारण पुणे शहरात गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लीम अतिशय छान पद्धतीने राहतात. त्यांनी द्वेषपूर्ण वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असे रुपाली पाटील म्हणाल्या. कुलकर्णी यांनी केलेल्या आंदोलनाला रुपाली पाटील यांनी स्टंटबाजी म्हणत हिणवले.
शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांचे नमाज पठण, मेधा कुलकर्णी यांचा आरोप
शनिवारवाड्यात मुस्लीम महिलांनी सामूहिक नमाज पठण केल्याचा आरोप करून मेधा कुलकर्णी यांना समाज माध्यमांवर एक चित्रफित प्रसिद्ध केली. रविवारी दुपारी चार वाजता हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी शनिवारवाड्यासमोर आंदोलन केले. तसेच गोमुत्र शिंपडून आणि शिववंदना म्हणून आम्ही आमची जागा पुन्हा पवित्र केली, असेही हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांनी सांगितले.