सुरुवातीला धुक्यामुळे दृश्यमानता कमी होती, यामुळे धावपट्टीचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याचं सांगण्यात आलं. मात्र नव्या व्हिडीओत विमान हवेत असतानात त्यात बिघाड झालं असावं, असं दिसत आहे. अजित पवार बारामती विमानतळाच्या दिशेनं जात असताना हवेत अचानक त्यांचं विमान चक्क ९० अंशात फिरल्याचं दिसून येत आहे. हा धडकी भरणारा व्हिडीओ गोजुबावी ग्रामपंचायतीच्या एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबतचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज १८ मराठीच्या हाती लागलं आहे.
advertisement
बारामती विमानतळाच्या धावपट्टीजवळ असलेल्या गोजुबावी ग्रामपंचायतीत लावलेल्या सीसीटीव्हीत विमान अपघातापूर्वीचा प्रसंग कैद झाला आहे. या सीसीटीव्ही व्हिडीओत हे विमान हवेतच ९० डिग्रीमध्ये एका बाजूला कलंडल्याचं दिसून आलंय. त्यामुळे या विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता का? असा प्रश्न तज्ज्ञांकडून विचारला जातोय. या प्रकारानंतर अवघ्या काही सेकंदात हे विमान कोसळलं आणि कोसळल्यानंतर आगीचे लोळ दिसून येत आहेत.
हा नवा व्हिडीओ समोर आल्यानंतर तज्ज्ञांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विमान डाव्या बाजूला का कलंडलं? विमानाचं इंजिन फेल झालं का? विमानाचा एकच लँडिंग गिअर उघडला? लँडिंगवेळी इंजिनात तांत्रिक बिघाड? विमान अनियंत्रित का झालं? असे अनेक सवाल आता उपस्थित झाले आहेत. त्यामुळे या अपघाताचं कारण फक्त धुकं नव्हतं, तर वेगळंही कारण असू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बारामती विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, आता 'ब्लॅक बॉक्स' हा तपासाचा मुख्य आधार आहे. लिअरजेट ४५ विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधून अपघातापूर्वीची विमानातील यंत्रणा आणि पायलटमधील संभाषण असा डेटा समोर येईल. ज्यामुळे अपघाताचं नेमकं कारण समजू शकणार आहे.
