मोठा धक्का बसला..
मीरा पाठक यांनी सांगितले की, अपघाताची धक्कादायक बातमी त्यांना त्यांच्या धाकट्या मुलाकडून दूरध्वनीवरून समजली. “अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानात सहवैमानिक म्हणून शांभवी होती, हे कळताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. उड्डाणाच्या आधी तिने मला सकाळी मोबाइलवर शुभ सकाळचा संदेश पाठवला होता. ती नेहमीच आपल्या कामात गुंतलेली असायची आणि क्वचितच संदेश पाठवायची. पण त्या दिवशी आलेला तिचा संदेश आयुष्यभर न विसरण्यासारखा ठरला,” असे त्या भावूक होत सांगतात.
advertisement
शांभवी पाठक हिने ग्वाल्हेर येथे पाचवीपर्यंत शिक्षण घेतले होते. लहानपणापासूनच तिला आकाशात झेप घेण्याचे स्वप्न होते. पुढील शिक्षणासाठी ती दिल्लीला गेली आणि त्यानंतर न्यूझीलंडमध्ये जाऊन तिने व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर तिने सहवैमानिक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. दिल्ली, लंडन आणि रशिया येथे तिने विविध उड्डाणांमध्ये सहभाग घेतला होता. “विमान चालवणे हेच तिचे जग होते,” असे तिच्या आजीने सांगितले.
सुखी संसाराची स्वप्ने अपघातात उद्ध्वस्त
अवघ्या २५ व्या वर्षी वैमानिक म्हणून स्थिरावलेल्या शांभवीच्या भविष्यासाठी तिच्या आई-वडिलांनी मोठी स्वप्ने पाहिली होती. आता मुलीचे लग्न लावून द्यावे, तिचा सुखी संसार उभा राहावा, यासाठी वर शोधण्याचे कामही सुरू झाले होते. शांभवीची आई हवाई दलाच्या बाल भारती शाळेत शिक्षिका असून वडील हवाई दलातून निवृत्त झाले आहेत. तिचा भाऊ सध्या नौदलात कार्यरत आहे.
बुधवारी दक्षिण दिल्लीतील त्यांच्या घराच्या परिसरात शोककळा पसरली होती. हसतमुख, कर्तव्यनिष्ठ आणि महत्त्वाकांक्षी शांभवीच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. अपघाताची बातमी समजताच आई-वडील तातडीने पुण्याकडे रवाना झाले.
“ती आमच्यासाठी केवळ नात नव्हती, तर घराचा आधारस्तंभ होती. तिच्या आठवणी कायम आमच्या सोबत राहतील,” असे सांगताना मीरा पाठक यांचे डोळे पाणावले.
