रोहित पवारांचं ट्वीट
एका सरकारी कर्मचाऱ्याच्या पगारात तीन कंत्राटी कर्मचारी काम करतील या आशयाचे एका बड्या नेत्याचे वक्तव्य ऐकूण व बदलती भूमिका बघून आश्चर्य वाटले. याच दृष्टीने विचार केला तर एका आमदारावर, खासदारावर होणाऱ्या करोडो रुपयांच्या शासकीय खर्चात हजारो कर्मचारी काम करतील.
बंडखोर आमदारांच्या सुरक्षेवर १५० कोटी खर्चासाठी, #शासन_आपल्या_दारी च्या एकेका सभेसाठी ८-१० कोटी व त्याच्या जाहिरातीवर ५२ कोटी, सरकारने गेल्या वर्षी केलेल्या कामांची यावर्षी जाहिरात करण्यासाठी शेकडो कोटी खर्च करताना काटकसर करावी, असा विचार शासन कधी करत नाही. शासकीय खर्चाची #उधळमाप शासनाला चालते. मग #नोकर_भरती साठीच शासन एवढा बारीक विचार का करते?
advertisement
सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून #परीक्षा फीच्या माध्यमातून हजारो कोटींची वसुली करूनही पारदर्शक परीक्षा न घेऊ शकलेले सरकार प्रायव्हेट कंपन्यांना फायदा देण्यासाठी आज #कंत्राटी #भरतीसाठी जीआर काढत आहेत. केंद्र सरकार प्रमाणे कंत्राटी भरतीचे गुणगान गात आहे. सरकारला #कंत्राटी_भरती ची एवढीच हौस असेल तर राज्य सरकारच कंपनीला कंत्राटी पद्धतीने चालवायला द्या.
असं ट्वीट रोहित पवारांनी केलं.
रोहित पवारांच्याच ट्विटरचा धागा पकडत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सरकारला उपरोधिक टोलाही लगावला आहे. सरकारच आपण कॉन्ट्रॅक्टवर देऊया, म्हणजे आज जेवढा पगारावर खर्च येतो, त्याच्या एक तृतियांश पैशात आपल्याला खर्च वाचवता येईल. सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना घरी घालवू आणि कॉन्ट्रॅक्टवर सरकार चालवायला देऊ, म्हणजे उरलेली सगळी रक्कम आपल्याला विकासावर खर्च करता येईल, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.
