जळगाव येथे समृद्ध खान्देश निर्धार मेळावा पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी अजित पवार यांनी प्रतिभा शिंदे यांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची शाळा घेतली.
अजितदादांनी कार्यकर्त्यांना फटकारले
प्रतिभा शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. प्रतिभा शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्षाला फटका बसेल, अशा तक्रारी अजित पवार यांच्या कानावर गेल्या होत्या. अजित पवार यांनी या तक्रारींचा आपल्या भाषणात उल्लेख करत कार्यकर्त्यांना फटकारले. कार्यकर्ते कमी असले तरी चालतील, म्हणजे असतील ते जीवाला जीव देणारे पाहिजेत. प्रतिभा शिंदे पक्षाशी जोडल्या गेल्याने जळगाव, धुळे, नंदुरबार यासह संपूर्ण महाराष्ट्र तसेच गुजरातमधील काही भागातही पक्षाला निश्चितच बळ मिळणार आहे, असे अजित पवार म्हणाले.
advertisement
भेदभावातून वजाबाकी होते, बेरीज होत नाही, अजितदादांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले
स्वतःची प्रतिमा चांगली ठेवा आपोआप लोक तुमच्याकडे येतील. दोन माणसे कमी असली तरी चालतील पण राहिलेली माणसं जीवाला जीव देणारी असावीत. तरच आपण पुढे जाऊ. वागताना सर्वांना सोबत घेऊ जा. भेदभाव करू नका. भेदभावातून वजाबाकी होते. बेरीज होत नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी कार्यकर्त्यांचे कान उपटले. आम्ही मागील ३५ वर्ष राजकारणात टिकलो, ते कामामुळे टिकलो, असेही यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना अजित दादा म्हणाले.
प्रतिभा शिंदे यांच्याकडून अजित पवार यांचे कौतुक
प्रतिभाताईंनी आयुष्यभर गोरगरिबांच्या हितासाठी, त्यांच्या न्यायासाठी लढा दिला. एक प्रमुख सामाजिक कार्यकर्त्या, आदिवासी समाजाच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आहे. तापी-नर्मदा नदीच्या खोऱ्यात तसंच सातपुडा पर्वत रांगांमध्ये वसलेल्या आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, बहुजन समाजाच्या न्याय-हक्कांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिभाताई लोकसंघर्ष मोर्चाच्या माध्यमातून लढा देताहेत. शेतकरी बांधव, आदिवासी बांधवांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली. आपल्या लढवय्या स्वभावामुळे त्यांनी अनेकदा तुरुंगवास देखील भोगला आहे, असे कौतुकही अजित पवार यांनी केले.