याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात मोदकांची मागणी वाढते, त्यामुळे आंबेमोहर तांदळाची देखील मागणी वाढते. कारण, आंबेमोहर तांदूळ खास मोदक तयार करण्यासाठी वापरला जातो. मोदकाची चव आणि गुणवत्तेसाठी हा तांदूळ उच्च दर्जाचा मानला जातो. गेल्यावर्षी आंबेमोहोर तांदूळ बाजारात आला त्यावेळी त्याचे दर साधारणतः 60 ते 70 रुपये किलो होते. पण, गेल्यावर्षी या तांदळच्या उत्पादनातच मोठी घट झाली होती. त्यामुळे आंबेमोहर तांदळाचा पहिल्यापासून काहीसा तुटवडा जाणवत होता.
advertisement
सुगंधी तांदळासोबतच इतर प्रकारच्या तांदळाच्या दारामध्येही वाढ झाली आहे. वाढलेल्या मागणीमुळे बाजारात तांदळाच्या किमतीवर लक्षणीय प्रभाव पडला आहे. विशेषतः सुगंधी बासमती, कालीमूछ, चिनोर, इंद्रायणी यासारख्या तांदळाची मागणी वाढल्याने त्यांच्या दरात वाढ झाली आहे.
कल्याणमधील दुकानदारांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या अनियमितपणामुळे आंबेमोहर तांदळाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. तसेच सण-समारंभामुळे ग्राहकांची मागणी वाढली. त्यामुळे, तांदळाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांना फटका बसत आहे. आंबेमोहर तांदळाच्या दरात झालेली वाढ डिसेंबरपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.
आंबेमोहोर खाणारा ग्राहक हा आंबेमोहोर तांदळालाच पसंती देतो. तो अन्य तांदळाचा वापर करत नाही. अगदी परदेशातही या तांदळाला मागणी आहे. हा तांदूळ भारतातूनच निर्यात केला जातो. मर्यादित उत्पादन आणि ग्राहकांची वाढती संख्या यामुळे आंबेमोहरचे दर वाढले आहेत. या वर्षी देखील आंबेमोहर तांदळाच्या उत्पादनात काहीशी घट होण्याचा अंदाज आहे.