राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला हतबल करण्याच्या प्रयत्नांसह काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
>> अमित शाह यांनी काय सांगितलं?
दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सबुरीचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास ५० मिनिटे चर्चा झाली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे भाजपकडून शिवसेनेच्या फोडून पक्षात प्रवेश दिला जात असल्याची नाराजी व्यक्त केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सगळं म्हणणे ऐकल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदे यांना सूचना केल्या. यामध्ये महाराष्ट्राचा बॉस कोण, याचे संकेतच त्यांनी दिले असल्याची चर्चा सुरू आहे. राज्यातील महायुतीमधील मतभेदांबाबत चर्चा ही राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच करण्याची सूचना अमित शाह यांनी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्ष फोडून प्रवेशाबाबत शाह म्हणाले की, पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या तक्रारी करण्याऐवजी शिवसेनेनंच आपलेच नेते आणि कार्यकर्ते जपावेत असा सल्ला त्यांनी शिंदे यांना दिला.
आपले नेते, पदाधिकारी-कार्यकर्ते इतर पक्षात जाणार नाहीत याची काळजी घ्यावी असेही शाह यांनी सांगितले. मित्रपक्षांवर जाहिरपणे नाराजी दाखवणे, बैठकांवर बहिष्कार अशा गोष्टी करण्यापेक्षा समन्वयातून मार्ग काढा, मतभेदांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
