अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड-राजुरा बाजार मार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात एसटी बस आणि प्रवासी ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत शाळकरी मुलांसह तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकूण चौघांनी आपले प्राण गमावले आहेत. या अपघातात आणखी काही जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वरुड येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, वरुड तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थी नेहमीप्रमाणे सकाळी वरुडकडे जात होते. यावेळी ऑटोमधून जात असताना समोरून येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती रीक्षचा चक्काचूर झाले. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. रस्त्यावर सगळीकडे रक्त वाहत होते, वाहनांचे तुकडे आणि जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर हादरून गेला.
शाळकरी मुलासह अन्य तिघांचा जागीच मृत्यू
या दुर्घटनेत ऑटोतील शाळकरी मुलासह अन्य तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती असून त्यांना तातडीने वरुड येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्याची तयारी सुरू आहे.
वरुड-राजुरा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प
अपघाताची माहिती मिळताच वरुड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मदत व बचावकार्य सुरू करत जखमींना रुग्णालयात पोहोचवले. काही काळासाठी वरुड-राजुरा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही
या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेगावर नियंत्रण नसणे आणि रस्त्याची अरुंद अवस्था हे संभाव्य कारण मानले जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सतत होणाऱ्या अपघातांमुळे या मार्गावर तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे.
हे ही वाचा :
