अमरावती : अमरावतीमध्ये गेल्या 17 वर्षापासून अर्हम युवा सेवा ग्रुप हे समाजसेवेत कार्यरत आहे. त्यांच्याकडून अनेक गरजू व्यक्तींना सीजनेबल सेवा पुरवल्या जातात. हिवाळ्यात त्यांनी अनेक गरजू लोकांना ब्लँकेटचे वाटप केलेत. त्याचबरोबर लोकांच्या घरोघरी जावून ते रद्दी गोळा करतात आणि त्याच रद्दीच्या पैशातून गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणात सुद्धा मदत करतात. आता उन्हाळ्यात त्यांनी अमरावतीमध्ये दोन ठिकाणी अर्हम जल मंदिर सुरू केले आहे. त्यामाध्यमातून अनेक लोकांची तहान भागवली जात आहे. त्याचबरोबर प्राणी आणि पक्षांसाठी त्यांनी घरोघरी मातीचे भांडे सुद्धा वाटप केले आहेत.
advertisement
अर्हम युवा सेवा ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कार्याबाबत दिपिका यांच्याशी लोकल18 ने चर्चा केली. तेव्हा त्या सांगतात की, परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांनी 2005 मध्ये अर्हम युवा सेवा ग्रुपची स्थापना केली. जेव्हा मुलुंडमध्ये पुर आला होता तेव्हा जनजीवन विस्कळित झाले. त्यावेळी परम गुरुदेव श्री नम्रमुनी महाराज साहेब यांना विचार आला की, सामान्य लोकांना मदत करण्यासाठी कोणी तरी असायला पाहिजे? गरजू लोकांच्या भावना, संवेदना समजून घेईल अशा लोकांचा ग्रुप आपण तयार केला तर त्यातून जिवदया आणि मानवतेचे कार्य होईल. त्यासाठी त्यांनी अर्हम युवा सेवा ग्रुपची स्थापना केली. 2008 मध्ये अमरावतीत या ग्रुपची प्रचिती झाली आणि कार्य करण्यास सुरुवात झाली.
‘मोहब्बत का शरबत’ पिताना तुम्ही करता का ही चूक? जीवावर बेतेल, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
रद्दीच्या पैशातून गरजूंना मदत
अर्हम युवा सेवा ग्रुपच्या माध्यमातून आम्ही अनेक गरजू लोकांना मदत करतो. त्यासाठी अमरावतीमधील अनेक लोकं मदत करतात. त्यांच्या सहकार्यातून आम्ही हे कार्य करत आहोत. वह्या, पुस्तके, न्यूज पेपर हे गोळा करून त्याची विक्री आम्ही करतो. त्याच पैशातून गरजू लोकांना मदत दिली जाते. रक्तदान, जलदान तर आहेच पण लोकांनी जर रद्दीदान केली तर अनेक गरजू लोकांना मदत करता येईल. अशा भावनेने आम्ही घरोघरी जावून रद्दी गोळा करतो, असे दिपिका सांगतात.
अर्हम जल मंदिराच्या माध्यमातून वाटसरुंची तृष्णा तृप्ती
उन्हाळा सुरू झाला की, फक्त मानवी जीवच नाही तर पशु पक्षी यांचे सुद्धा तहानेमुळे मृत्यू होतात. कारण पाणी म्हणजे जीवन आहे हे आपण जाणतो. याच विचारातून अमरावतीमधील दोन ठिकाणी अर्हम जल मंदिर सुरू करण्यात आले आहे. हे जल मंदिर पूर्णतः लोकवर्गणीतून चालते. कोणाच्या वाढदिवसानिमित्त दान दिले जाते तर एखाद्याकडून सहखुशीने कधीही दान करण्यात येते. दररोज आम्हाला दोन्ही ठिकाणी 49 ते 45 कॅन पाणी लागत आहे. त्यामुळे अनेक लोकांची तृष्णा तृप्ती होत असल्याने मिळणारा आनंद मोजता येणार नाही असा आहे, असे दिपिका सांगतात.