मध्य रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार, ही ट्रेन नागपूर विभागातील अकोला, बडनेरा आणि वर्धा या महत्त्वाच्या स्थानकांवर आतापर्यंतच्या वेळेपेक्षा आधी पोहोचणार असून त्या स्थानकावरून देखील लवकर सुटणार आहे. यामुळे प्रवाशांना केवळ वेळेची बचत होणार नाही, तर इतर गाड्यांशी होणारी कनेक्टिव्हिटीही अधिक सुलभ होणार आहे.
advertisement
प्रमुख स्थानकांवरील वेळेत बदल
सुधारित वेळापत्रकानुसार, पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेस अकोला आणि बडनेरा स्थानकांवर सुमारे 10 मिनिटे आधी पोहोचेल तसेच तेथून लवकर सुटेल. याशिवाय वर्धा स्थानकावरही ट्रेन नियोजित वेळेच्या आधी धावणार असल्याने नागपूर विभागातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. सकाळी किंवा संध्याकाळी पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा बदल अधिक सोयीचा ठरणार आहे.
प्रवाशांचा वेळ वाचणार, कार्यक्षमता वाढणार
या वेळापत्रकातील सुधारणेमुळे ट्रेनचा एकूण प्रवासकाल अधिक सुव्यवस्थित होणार आहे. तसेच वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनची ऑपरेशनल कार्यक्षमता वाढणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या मार्गावर प्रवास करणाऱ्या नोकरदार, विद्यार्थी आणि व्यावसायिक प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
प्रवाशांना महत्त्वाचे आवाहन
26 डिसेंबर 2025 पासून हे सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. त्याआधी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी पुणे-अजनी वंदे भारत एक्सप्रेसचे नवीन वेळापत्रक तपासून घ्यावे, असे आवाहन मध्य रेल्वे, नागपूर विभागाकडून करण्यात आले आहे. यामुळे प्रवासादरम्यान होणारा गोंधळ टाळता येणार असून, प्रवाशांचा अनुभव अधिक सुखकर होणार आहे.
वंदे भारतचे वेळापत्रक
ही गाडी पुण्यातून सकाळी 6.25 मिनिटांनी सुटते. अकोला स्थानकावर दुपारी 2.50 मिनिटांनी पोहोचते. तेथून 2 मिनिटांनी सुटते. त्यानंतर बडनेरा येथे 3.58 मिनिटांनी पोहोचते. तेथून 2 मिनिटांनी सुटून वर्धा येथे सायंकाळी 5.08 मिनिटांनी पोहोचते. या वेळेत आता 10 मिनिटांचा बदल होणार आहे. गाडी 10 मिनिट आधी पोहोचणार असून तेवढीच लवकर सुटणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.






