सदाशिव पेठेतील पूना हॉस्पिटलजवळील कुंभारवाडा परिसरात 'राज आर्टस्' नावाने मूर्तींचा व्यवसाय करणारे राजेश बेलसरे सांगतात, हा आमचा पिढीजात व्यवसाय आहे. आता आमची तिसरी पिढी देवींच्या मूर्ती घडवत आहे. पूर्वीप्रमाणे आता प्रशिक्षित कारागीर सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे आम्हाला पेण येथून कच्च्या मूर्ती आणाव्या लागतात आणि त्यावर रंगकाम करावे लागते.
advertisement
बेलसरे यांच्या मूर्तीशाळेत नवरात्रीसाठी विविध देवींच्या मूर्ती तयार केल्या जातात. कालिकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, मोहटा देवी, भारतमाता तसेच वाघावर किंवा सिंहावर बसलेल्या देवींच्या मूर्ती भाविकांना येथे पाहायला मिळतात. 1 फूट ते 7 फूट उंचीपर्यंतच्या मूर्ती उपलब्ध आहेत. मूर्तींची किंमत 1 हजार रुपयांपासून सुरू होते.
राजेश बेलसरे म्हणाले, "मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदा मूर्तींची मागणी किंचित कमी झाली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर घातलेली बंदी आणि तयार मूर्तींच्या ऑनलाइन उपलब्धतेमुळे पारंपरिक मूर्तिकारांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. तरीसुद्धा, नवरात्र हा उत्सव देवीच्या मूर्तींशिवाय अपूर्ण असल्याने भाविक कुंभारवाड्याकडे आकर्षित होतात."
कुंभारवाड्यातील गल्लीबोळात सध्या रंगांची उधळण दिसत आहे. मूर्तींना लाल, हिरवे, सोनेरी रंग देऊन त्यांना आकर्षक रूप दिलं जात आहे. प्रत्येक मूर्तीच्या चेहऱ्यावर शांत, तेजस्वी भाव आणण्यासाठी कारागीर विशेष काळजी घेतात. देवींच्या डोळ्यांना फार महत्त्व असल्याने त्यांचं रंगकाम अत्यंत बारकाईने केलं जातं.
नवरात्रीपूर्वी कारागीरांना रात्रीचा दिवस करून काम करावे लागते. मूर्ती बनवणे हे फक्त उपजीविकेचे साधन नसून त्यामागे श्रद्धा, परंपरा आणि कला जपण्याची भावना आहे. आजच्या बदलत्या काळातही कुंभारवाडा कला आणि परंपरा जपणारा घटक ठरत आहे.