लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार रमेशअप्पा कराड यांच्या वतीने आज लातूर येथे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील आणि शहराध्यक्ष अजितसिंह कव्हेकर यांच्या सत्कार समारोहाचे आणि कार्यकर्ता संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला आमदार अभिमन्यू पवार, ज्येष्ठ नेते पाशा पटेल, अर्चनाताई पाटील, नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
advertisement
काँग्रेसमध्ये मी १४ वर्षे वनवास भोगला, माझ्यावर जाणून बुजून आरोप झाले
अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेसमध्ये मी १४ वर्षे राजकीय वनवास भोगला. राजकीय कारकीर्दीत यशोशिखरावर असताना २०१० मध्ये माझ्यावर विविध आरोप करण्यात आले. मला बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केले गेले. २०१० मध्ये आरोप झाल्यानंतरही मी नंतरच्या १४ वर्षांत काहीही बोललो नाही. परंतु ज्यावेळी मी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी मला बोलणे भाग होते. काँग्रेसमधून बाहेर पडताना ज्यांच्याकडे पाहून काम करायचंय असे मोठे नेतृत्व असावे असा सर्वंकष विचार करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
काँग्रेसमधल्या कोणत्या नेत्याने तुमच्यावर आरोप केले? अशोक चव्हाणांचे मौन
काँग्रेसमध्ये असताना आरोप झाले असे तुम्ही म्हणता परंतु तुमचा रोख कुणाकडे आहे, असे विचारले असता, माध्यमांना जे उत्तर हवे आहे, ते मी देणार नाही. त्यावर कधीही बोलणार नाही. परंतु राजकारणात काम करताना मतभेद असतात, पण ते वैयक्तिक असता कामा नये असे वाटते, असे अशोक चव्हाण म्हणाले.
काँग्रेसमध्ये जे जे काही झाले, जे काही माझ्या वाट्याला आले ते सोडून देऊन नव्याने पुन्हा वाटचाल करण्याचे ठरवले. त्यानुसार माझी राजकीय वाटचाल अत्यंत चांगली सुरू आहे, असे सांगायला देखील अशोक चव्हाण विसरले नाहीत.