आरोपीनं केलेली मागणी विवाहितेनं पूर्ण करण्यास नकार दिल्यानंतर हा रक्तरंजित कांड घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. सध्या ती आष्टी तालुक्यातील कडा इथं आपल्या आईसोबत वास्तव्याला आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिचे अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते. मागील काही वर्षांपासून दोघं प्रेमसंबंधात होते.
advertisement
घटनेच्या दिवशी मंगळवारी रात्री आरोपी तरुण पीडित महिलेच्या घरी गेला होता. यावेळी आरोपीनं तिच्याकडे फोनची मागणी केली. पण विवाहितेनं फोन देण्यास नकार दिला. त्यामुळे आपल्या प्रेयसीचे बाहेर कुणासोबत तरी अफेअर असावं, असा संशय आरोपीला आला. त्यामुळे त्याने महिलेकडे मोबाइल देण्याचा हट्ट केला. पण तिने फोन देण्यास साफ नकार दिला. यानंतर संतापलेल्या प्रियकराने तिच्यावर तलवारीने हल्ला केला.
ही घटना मंगळवारी रात्री आष्टी तालुक्यातील कडा येथे घडली असून, यात प्रेयसी गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पीडितेला कुटुंबीयांनी तातडीने कडा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. या हल्ल्यात तिच्या मानेला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून अशाप्रकारे विवाहितेवर हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
