गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासाला जी गती मिळाली ती थांबू देणार नाही. पुढच्या पाच वर्षात महाराष्ट्राच्या प्रगतीला वेगळ्या उंचीवर नेलं जाईल. महाराष्ट्राला हवं असलेलं सुशासन फक्त महायुतीचं सरकार देऊ शकते. महाआघाडीच्या गाडीला ना चाकं आहेत, ना ब्रेक आहे. ड्रायव्हरच्या सीटवर बसण्यासाठी त्यांच्यात भांडण सुरू असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
advertisement
मविआने सरकार आणि जनतेला लुटलं
राजकारणात येताच प्रत्येकाचं ध्येय असतं. आम्ही जनतेला देव मानतो. जनतेच्या सेवेसाठी राजकारणात आलो. पण काही लोकांच्या राजकारणात येण्याचा उद्देश लोकांना लुटणं आहे. लोकांना लुटणारे मविआसारखे लोक सरकारमध्ये येतात तेव्हा विकास रोखतात. प्रत्येक योजनेत भ्रष्टाचार करतात. तुम्ही महाविकास आघाडीच्या धोक्यानं बनलेल्या सरकारला पाहिलंय. या लोकांनी सरकार आणि नंतर जनतेला लुटलं असा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला.
मविआची योजनांना आडकाठी, महायुती येताच स्थिती बदलली
मविआने विकासकामांना रोखण्याचं काम केलं असंही मोदी म्हणाले. त्यांनी म्हटलं की, या लोकांनी मेट्रो योजना अडकवल्या. वाढवण बंदरात आडकाठी आणली. समृद्धी महामार्गाला ब्रेक लावला. महाराष्ट्राचं भविष्य उज्ज्वल बनवणाऱ्या योजनांना त्यांना आडकाठी आणली. राज्यात महायुतीचं सरकार येताच ही स्थिती बदलली. लाडकी बहीणची चर्चा देशभरात आहे. पण काँग्रेसकडून ही योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचलं जात आहे. योजनेविरोधात ते कोर्टात पोहोचले आहेत. सत्ता मिळाली तर ते सर्वात आधी ही योजना बंद करतील.
एक रहेंगे तो सेफ रहेंगे
काँग्रेसने धर्माच्या नावावर षडयंत्र रचलं तेव्हा देशाची फाळणी झाली. आता काँग्रेस एससी, एसटी ओबीसीमध्ये जातींना एकमेकांविरोधात उभा करत आहे. भारतात यापेक्षा मोठं षडयंत्र असू शकत नाही. वेगवेगळ्या जातींमध्ये विभागल्याने तुमची ताकद कमी होईल. एक असाल तर सुरक्षित रहाल.