नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी ३:३० ते ४ वाजेच्या सुमारास एका काळ्या-पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून २० ते २२ वयोगटातील तीन तरुण बजाजनगर परिसरात आले. या तिघांच्याही हातात धारदार तलवारी आणि लाकडी दांडके होते. बजाजनगरातील महाराणा प्रताप चौक, सावरकर कॉलनी आणि मोहटादेवी चौक या गजबजलेल्या भागात या तरुणांनी आरडाओरडा करत दहशत माजवली.
advertisement
नागरिकांवर वार आणि वाहनांची तोडफोड
हे तरुण केवळ दहशत माजवून थांबले नाहीत, तर त्यांनी समोर दिसणाऱ्या लोकांवर आणि वाहन चालकांवर तलवारीने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याशिवाय, रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर तलवारीने व दांडक्याने प्रहार करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. यामुळे सर्वसामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हेगारांनी वापरलेली दुचाकी आणि दोन तलवारी जप्त केल्याचे समजते. मात्र, इतकी गंभीर घटना घडून आणि नागरिक जखमी होऊनही उशिरापर्यंत याप्रकरणी कोणताही अधिकृत गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलिसांच्या या टाळाटाळीमुळे स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
औद्योगिक वसाहत असलेल्या वाळूज परिसरात भरदिवसा अशा प्रकारे तलवारी नाचवल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. नशाखोरी करून दहशत माजवणाऱ्या अशा गुंडांवर पोलीस कठोर कारवाई करणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
