सत्याचा मोर्चा राज्यभरात गाजतोय. शनिवारी ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात विरोधकांनी त्यांची ताकद दाखवून दिली. मात्र मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिलेली नव्हती. बाळा नांदगावकर यांच्यासह सहा जणांविरुद्ध आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळा नांदगावकर यांच्यासह कुलाबा विभाग प्रमुख बबन महाडिक, शिवसेना ठाकरे गटाचे जयवंत नाईक, बबन घरत आणि मनसेचे अरविंद गावडे यांच्यावर आझाद मैदानात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
दुसरीकडे शनिवारीच सत्याचा मोर्चाला भाजपनं मूक आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं. तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून भाजप नेत्यांनी बाबुलनाथ मंदिर ते गिरगाव चौपाटी या मार्गावरून मूक आंदोलन केलं. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला.
मूक आंदोलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा का दाखल केला नाही? असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. विरोधकांनी मूक आंदोलनावर टीका केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही जशास तसं उत्तर दिलं. भाजपच्या आंदोलनामुळे मुंबईकर वेठीस धरले गेले नाही, असा मुद्दा भाजपकडून उपस्थित करण्यात आला.
मूक आंदोलन आणि सत्याचा मोर्चावरून राज्यात नवा संघर्ष सुरू झालाय. सत्याचा मोर्चामध्ये ठाकरे बंधूंनी दुबार मतदार आणि मत चोरी करणाऱ्यांना फोडून काढण्याची भाषा केली होती. चुकीच्या पद्धतीने मतदार वाढवले जात आहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता. एकंदरीतच मत चोरीनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मुद्यावरून सुरू झालेली खणाखणी पुढील काही दिवस सुरू राहण्याची चिन्हं दिसत आहेत.
