अंबरनाथ नगरपरिषद निवडणुका २ डिसेंबरला होणार होत्या; मात्र संबंधित वादावर दाखल झालेल्या अपीलामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल करत मतदानाची तारीख तब्बल १८ दिवसांनी पुढे ढकलली आहे. आता अंबरनाथमध्ये मतदान २० डिसेंबर रोजी होणार आहे. तर, निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे.
अंबरनाथ शेजारील कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची निवडणूक उद्या पार पडणार आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतही मोठा ट्वीस्ट समोर आला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधीच ठाकरे गटाच्या निवडणूक चिन्हावर लढणाऱ्या सात जणांनी नगराध्यक्षपदी थेट भाजपला पाठिंबा दिल्याने राजकीय उलटफेर झाला आहे. स्थानिक ठाकरे गटही आक्रमक झाला असून भाजपला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे स्पष्ट केले.
advertisement
बदलापूर नगर परिषदेसाठीचा प्रचार आज रात्री १० वाजता संपणार आहे. उद्या, मंगळवारी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. उद्या होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. मात्र, कुळगाव-बदलापूरची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापूरची मतमोजणी पुढे का ढकलली?
तांत्रिक मुद्यावर राज्य निवडणूक आयोगाने काही नगर परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. तर, कुळगाव-बदलापूरमधील ६ प्रभागातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक १५ ब, १७ अ, १० ब, ८ अ, ५ ब, १९ अ या प्रभागांचा समावेश आहे. या जागांवर २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर, उर्वरित जागांवर उद्याच २ डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मात्र, मतमोजणी ही एकत्रिच होणार आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेची मतमोजणी २१ डिसेंबर रोजीच होणार आहे.
