नेमकं काय घडलं?
पवार कुटुंबीय पैठण येथील कार्यक्रम उरकून रात्री उशिरा पाटोद्याकडे निघाले होते. बीड बायपासमार्गे मांजरसुंबा कडे जाताना अचानक त्यांच्या कारमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि गाडी बंद पडली. बाहेर घोर अंधार, सामसूम रस्ता आणि सोबतीला पत्नी-मुलं... काही अघटित तर घडणार नाही ना, या भीतीने पवार कुटुंबीयांनी कारमध्येच बसून राहणे पसंत केले. अशातच गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाने त्यांची अवस्था पाहिली.
advertisement
पोलिसांचा माणुसकीचा खांदा!
पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गुंड, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर जाधव आणि चालक राहुल चव्हाण यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. त्या निर्मनुष्य जागी कोणाला मदतीला बोलावणे शक्य नव्हते. त्यामुळे या तिन्ही पोलिसांनी स्वतः कारला धक्का मारण्याचा निर्णय घेतला. सलग एक किलोमीटर कार ढकलल्यानंतर अखेर तिसऱ्या गिअरला गाडी सुरू झाली आणि पवार कुटुंबाचा जीव भांड्यात पडला.
चोरांच्या धास्तीत मिळाला पोलिसांचा आधार
"माझ्या पत्नीच्या अंगावर दागिने होते आणि आमच्याकडे मौल्यवान वस्तू होत्या. जर पोलिसांऐवजी चोर तिथे आले असते तर काय झाले असते, याची कल्पनाही करवत नाही," अशा शब्दांत अरुण पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी बीडमध्ये जाऊन या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कर्तव्यासोबतच माणुसकी जपणाऱ्या या पोलिसांचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
