सात तास राठोड यांना बेदम मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, चहा पिण्याच्या बहाण्याने अप्पा राठोड यांना दुचाकीवरून एका निर्जनस्थळी नेण्यात आले. तिथे ५ ते ६ जणांनी त्यांना दारू पाजून जबरदस्तीने वाहनातून अपहरण केले. त्यानंतर तब्बल सात तास राठोड यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्यांच्या डोक्याला सात टाके पडले असून, त्यांच्या शरीरावर सर्वत्र जखमांचे आणि मारहाणीचे व्रण उमटले आहेत. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
व्हिडीओ देखील बनवला
या घटनेने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे, कारण परळीतील शिवराज दिवटे मारहाण प्रकरण ताजे असतानाच असाच प्रकार पुन्हा घडला आहे. हे गुंड इथेच थांबले नाहीत, तर त्यांनी अप्पा राठोड यांना मारहाण करतानाचा व्हिडीओ देखील बनवला आहे. हाच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी राठोड यांना दिली असल्याचे आप्पा यांनी स्वतः सांगितले आहे.
सायंकाळी 6 वाजता अपहरण
अप्पा राठोड यांच्या म्हणण्यानुसार, १८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता त्यांचे अपहरण करण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता त्यांना सोडून देण्यात आले. या ९ तासांच्या काळात त्यांना खूप मारहाण करण्यात आली आणि त्याचे व्हिडीओ बनवण्यात आले. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन एक पत्र दिले. मात्र, दुर्दैवाने अद्याप त्यांचा जबाब घेण्यासाठी कोणीही पोलीस आलेले नाही. "माझी सुट्टी संपताच मी स्वतःच तक्रार देणार आहे," असे आप्पा राठोड यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात अद्याप गुन्हा दाखल न होणे आणि पोलिसांकडून दिरंगाई होणे हे चिंतेची बाब आहे. या घटनेतील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई होणे आणि पीडिताला न्याय मिळवा, अशी मागणी केली जात आहे.
