मध्यरात्री दोनच्या सुमारास...
बीडच्या लिंबागणेश परिसरात पवनचक्की उभारणीचे काम सुरू असताना मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यावर सुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबारात एक चोरटा ठार झाला आहे. ठार झालेल्या व्यक्तीच अद्याप नाव समोर आलं नाही. मात्र यामुळे खळबळ उडाली आहे. नेकनूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले असून घटनास्थळाचा पंचनामा केला जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री दोनच्या सुमारास चोरी करण्याच्या उद्देशाने काही चोरटे पवनचक्की उभारण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी आले होते यावेळी सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला असता त्यात एकजण ठार झाला आहे.
advertisement
बीड जिल्ह्याला अधिक पसंती का?
बीड जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे बळकटी मिळत आहे, तर दुसरीकडे याच पवनचक्की प्रकल्पांमुळे गुन्हेगारी देखील वाढल्याचं पहायला मिळतंय. गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात पवनचक्क्यांच्या उभारणीसाठी मोठी आर्थिक गुंतवणूक झाली आहे. या प्रकल्पांना लागणाऱ्या भूसंपादन, कच्च्या मालाचा पुरवठा, वाहतूक आणि बांधकाम साहित्याच्या वाढत्या गरजेमुळे जिल्ह्याच्या आर्थिक उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, या आर्थिक भरभराटीमुळे राजकीय आश्रय मिळालेले गुंड या पवन ऊर्जा प्रकल्पांकडे आकर्षित झाले आहेत, ज्यामुळे या उलाढालीतील वाटा मिळवण्यासाठी त्यांचे लक्ष या क्षेत्रावर केंद्रीत झाले आहे.
बीडमधील मातब्बर कंपन्या कोणत्या?
दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यात 'अवादा' (Avaada) व्यतिरिक्त 'इंडीग्रीड' (IndiGrid), 'कल्लम ट्रान्मिशन पॉवर' (Kallam Transmission Power), 'पनामा विंड एनर्जी' (Panama Wind Energy) आणि 'रिन्यू विंड' (ReNew Wind) यांसारख्या मातब्बर कंपन्यांनी आपले पवनचक्की प्रकल्प यशस्वीरित्या स्थापित केले आहेत.